पाणी टंचाईच्या वेळी पाणी प्रश्‍न का आठवतो…

सुरेश प्रभू यांची प्रश्‍न: जल मित्र पुरस्कार प्रदान

पुणे – देशात पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले असले तरीही त्या पाणीप्रश्‍नाकडे मात्र गांभिर्याने पाहिले जात नाही. ज्यावेळी पाणी टंचाई भासते त्याच वेळेस लोकांना पाणी प्रश्न आठवतो, अशी टीका रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. पाणी प्रश्नावर शास्त्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना राबविणे गरजेचे असून पाण्याची उपलब्धता पाहून शेतीचे धोरण ठरवावे असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्‍त केले.
महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात गुजरातचे माजी जलसंपदा आणि आरोग्य मंत्री डॉ. जय नारायण वाघ यांना पाणी प्रश्नावर केलेल्या कार्यासाठी प्रभू यांच्या हस्ते जल – मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी प्रभू बोलत होते. जल भागीरथ फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त पृथ्वीराज सिंग, जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, पत्रकार राजा माने, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटिल आदी या वेळी उपस्थित होते.

प्रभू म्हणाले, सध्या पावसाळा सुरु आहे, हे पंचांग पाहून सांगावे लागते. बाहेरचे वातावरण पाहून, पावसाची स्थिती पाहून पावसाळा सुरु आहे, असे वाटत नाही. पर्यावरणातील बदलामुळे एवढी बिकट परिस्थिती ओढावली आहे. देशात 85 टक्के पाणी पावसाद्वारे तर उर्वरित 15 टक्के इतर मार्गाने उपलब्ध होते. यातील सर्वाधिक पाणी शेतीसाठी लागते. तरीही शेतीला पाणी पुरत नाही. काही ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेतीचे नुकसान होते. तर काही भागांत अती पाण्यामुळे शेतीचे नुकसान होते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीची धोरणे ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेवून काम करायला हवे.

सिंग म्हणाले, पाणी प्रश्न हा असा प्रश्न आहे, ज्यामुळे लोक भांडूही शकतात आणि एकत्रही येवू शकतात. पाण्यासाठी भांडणे केली तर पाणी प्रश्न सुटणार नाही. मात्र, पाण्यासाठी एकत्र आल्यास नक्कीच पाणी प्रश्न सुटेल. व्यास यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करत पाणीप्रश्‍नावर भाष्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)