“पाणी अडवा पाणी जिरवा’ प्रणालीमुळे टंचाईवर मात

नगर, दि. 18 (प्रतिनिधी) – राज्यातील महत्त्वाकांक्षी जलयुक्‍त शिवार अभियानात जिल्ह्यासाठी मार्च 2017 अखेर 280 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जामखेड तालुक्‍यात सुरू असलेल्या कामांची संख्या 1 हजार 139 असून, सर्वात जास्त कामे पूर्ण झालेली संख्या 736 आहे व कर्जत तालुक्‍यात 482 पैकी 299 कामे पूर्ण झाली आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील कर्जत-जामखेड या तालुक्‍याने “जलयुक्‍त’च्या कामात जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी जलसंधारणाच्या राबविलेल्या विविध प्रणालींमुळे पाणीटंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे. या सर्व कार्यक्रमाची फलश्रुती विचारात घेऊन “जलयुक्‍त शिवार’ अभियान राज्य शासनाने प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
संगमनेर तालुक्‍यातही “जलयुक्‍त’च्या कामांसाठी 35 गावांसाठी 922 ठिकाणी कामे सुरू असून, 546 ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. जामखेडनंतर सर्वात जास्त कामे संगमनेर येथे सुरू आहेत. श्रीरामपूर तालुक्‍यात “जलयुक्‍त’साठी एका गावाची निवड करून त्या गावात 16 ठिकाणी “जलयुक्‍त’ची कामे चालू असून 13 ठिकाणी ती कामे पूर्ण झाली आहेत. सर्वात कमी “जलयुक्‍त’ची कामे श्रीरामपूर तालुक्‍यात सुरू आहेत.
जिल्ह्यात 14 तालुक्‍यांत जलयुक्‍त शिवार अभियानातील एकूण गाव संख्या 268 असून, कामे सुरू असलेली संख्या 268 आहेत. या सर्व गावांत 5 हजार 75 ठिकाणी कामे सुरू असून, 2 हजार 79 गावांत कामे पूर्ण झाली आहेत, तर प्रगतीतील कामांची 2 हजार 496 संख्या आहे. आतापर्यंत जलयुक्‍त शिवार अभियानाच्या कामात एकूण 64 कोटी 82 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या ना त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी “जलयुक्‍त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या नावीन्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्‍वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्‍त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच.
या योजनेविषयी थोडेसे… जिल्ह्यात सतत उद्‌भवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्‍त महाराष्ट्र 2019 अंतर्गत “जलयुक्‍त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. या बाबी जिल्ह्याच्या विकासात एक आव्हान ठरत आहेत. जिल्ह्यात गेल्या चार दशकांत पाण्याच्या पुरेशा उपलब्धीअभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येतो. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी हे अभियान एकात्मिक पध्दतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करीत आहे. हे अभियान राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्‍चितपणे निर्माण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)