पाणीबाणीचे संकट कायम

वापर नियंत्रित ठेवा : पाटबंधारेचे आणखी एक पत्र


ऑक्‍टोबरमध्ये 1,355 एमएलडी पाणी वापरल्याचा दावा

पुणे – शहराला नियंत्रित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दररोज 1,150 एलएलडी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यानंतर महापालिकेने ऑक्‍टोबरमध्ये दररोज सरासरी 1,355 एमएलडी पाणी धरणातून उचलले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने पाणी वापर नियंत्रित करावा, असे पत्र पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाने दिले आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही नियोजन करण्यात येत नसल्याची तक्रारही आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

पाटबंधारे विभागाने नव्याने दिलेल्या पत्रानुसार, “मागील महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेस 11.50 टीएमसी पाणी प्रत्येक वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार, 15 जुलै 2019 पर्यंत हा पाणीसाठा वापरण्यासाठी महापालिकेने दररोज फक्‍त 900 एमएलडी पाणी पाणी घेणे अपेक्षीत आहे. मात्र, शहराच्या पाणी पुरवठयावर परिणाम होणार असल्याने महापालिकेस 1,150 एमएलडी प्रतिदिन हा नियंत्रित पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. पण, त्यापेक्षा जादा पाणी घेत जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही पालिकेकडून काहीच पाणी नियोजन करण्यात आलेले नसल्याने ऑक्‍टोबर-2018 मध्ये महापालिकेने सरासरी 1,355 एमएलडी पाणी दररोज उचलले असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.

तसेच कालवे, सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये रब्बीसाठी दोन व उन्हाळी हंगामात एक अशी आवर्तने देण्याचे ठरले आहे. त्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरणे अत्यावश्‍यक आहे. याशिवाय, 15 जुलैपर्यंत खडकवासला संयुक्‍त प्रकल्पातील पाणीसाठा हा पुणे शहराची सुमारे 40 लाख लोकसंख्येला व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पुरविणे आवश्‍यक असल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करणे ही जलसंपदा विभागाची जबाबदारी आहे,’ असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेचे डोळे मुख्यमंत्र्यांकडे
पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या पाणी वापराबाबत वारंवार पत्र देत असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महिन्यात दोन वेळा पुण्यात आल्यानंतर “पुण्याचे पाणी कमी करणार नाही’ तसेच “महापालिकेस आवश्‍यक असलेले पाणी दिले जाईल,’ असे आश्‍वासन दिले असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. तसेच शहरासाठी वाढीव पाणी मिळावे, यासाठी महापालिकेनेही शासनास पत्र पाठविले आहे. त्यामुळे शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी वारंवार महापालिकेस पत्र पाठवित असतानाच दुसरीकडे पालिका प्रशासन राज्य शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)