पाणीपुरवठ्याचा पहिल्याच दिवशी विचका

वेळापत्रक, नियोजनात विसंगती


नागरिक मात्र हवालदिल


ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणीबाणी 


पर्वतीसह कोथरूडमध्येही ठणठणाट 

पुणे – पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी महापालिका प्रशासनाने जाहीर केलेले पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. जाहीर केलेले वेळापत्रक आणि प्रत्यक्षात पाणी सोडण्यात येत असल्याची वस्तुस्थिती यामध्ये विसंगती येत असल्याने काही भागातील नागरिक हवालदिल झाले.

कोथरूड, पुण्याचा पूर्व भाग, बिबवेवाडी, पर्वतीदर्शन, गावठाण, शिवाजीनगरचा परिसर या ठिकाणांचा त्यात समावेश होता. शहरात पाच तास आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरला. कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाणी कपातीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर शहरात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने वेळापत्रक तयार करून त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पाणी सोडण्याला सुरूवात केली आहे. मात्र, वेळापत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. वेळापत्रक आणि प्रत्यक्षात पाणी सोडण्याच्या वेळा यामध्ये फरक पडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून पाच तास पाणी सोडण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे. मात्र, वस्तुस्थिती पाहता पाच तास पाण्याच्या पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी साठवण्यात अडचणी येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाणीपुरवठ्याच्या अंमलबजावणी आधीच तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रविवारी महापालिका आयुक्त आणि महापौरांना घेराव घातला. महापौर बंगल्यावर त्यांनी मोर्चा काढून, “पाणी पुरवठा सुरळीत करू’ असे या दोघांकडून लिहूनही घेतले होते.

पाणी पुरवठ्यासाठी खास सभा बोलवा
“शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, दिवाळी तोंडावर आली आहे. पाणी पुरवठ्याबाबत वेगवेगळी माहिती जनतेसमोर येत असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पुणेकरांना पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती मिळण्यासाठी दिवाळीपूर्वी खाससभेचे आयोजन करावे,’ अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी महापौरांना दिले आहे.

पाणीपुरवठ्यासाठी हेल्पलाइन

नियोजनानुसार एकवेळ पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्याविषयी नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी महापालिकेतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पाण्याची गळती, कमी दाबाने पाणी येणे आणि अन्य काही तक्रारी असतील तर त्यासाठी 1800-1030-222 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)