पाणीपातळी घटल्याने पळसनाथाचे दर्शन

उजनी धरणातील पाणीसाठा घटला : पळसदेवमध्ये जुन्या आठवणींना उजाळा

पळसदेव- उजनी धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने धरण बांधणी काळात विस्थापित झालेल्या गावांच्या पाण्याखालील पाऊलखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. प्राचीन स्थापत्य कलेचे अचाट सामर्थ्याची जाणीव करून देणारे पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर सध्या पाण्यातून डोके वर काढून उभे आहे. शेकडो वर्षांपूर्वीचे हे हेमाडपंथी मंदिर गेली साडेतीन दशकांहून अधिक काळ पाण्यात राहूनही सुरक्षित आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी उजनी धरण रिकामे झाल्यामुळे संपूर्ण मंदिर उघडे पडले होते. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे धरण बांधणी काळात विस्थापित झालेल्या बॅकवॉटरलगतच्या गावांतील प्राचीन मंदिरे, रस्ते, ब्रिटीशकालीन पूल, घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यानंतर सुमारे आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीनंतर गावखुणा ग्रामस्थांना जुन्या गावाच्या अस्तित्वाची आठवण करून देत असतात. यंदा मात्र दोन महिने अगोदरच पाण्याखालील गावखुणा डोके वर काढून उभा आहे. धरणासाठी लोकांनी आपली घरे, शेती सोडल्याने त्यांचे गावालगत पुर्नवसन करण्यात आले आहे. मात्र, जुन्या गावाशी जोडलेली नाळ अतूट आहे. या मंदिराकडे पाहिल्यानंतर तेथे घालवलेले बालपण आजही अनेकांच्या डोळ्यात तरळते. अनेकजण उघड्या पडलेल्या पूर्वीच्या शेतीवर आजही मेहनत करून जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन घेताना आढळून येतात. येथील जुन्या पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुल आजही पाहावयास मिळतात. आणखी काही दिवसांनी अनेक गावखुणा डोके वर काढतील, तशा लोकांच्या आठवणींनाही उजाळा मिळेल. मंदिर उघडे पडल्यावर अनेक इतिहास संशोधक या ठिकाणी भेटी देतात. यावर्षी हे मंदिर संपूर्णपणे उघडे होण्याच्या मार्गावर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)