पाणीकपात तूर्तास नाही; परंतु टांगती तलवार कायम

दोन-चार दिवसांत निर्णय सांगू – जलसंपदामंत्री गिरीश महाजन


कालवा सल्लागार समितीची मुंबईत बैठक

पुणे – पाणी पुरवठा विषयात जलसंपदा विभाग, महापालिका आणि आमदार असा कलगीतुरा आणखीनच रंगला आहे. कालवा सल्लागार समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत “तूर्तास पाणीकपात नाही’ असे जरी सांगितले असले, तरी “पाणीवाटपाबाबत दोन-चार दिवसांत निर्णय सांगू’ अशी भूमिका घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम ठेवली आहे.

विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, योगेश टिळेकर, अजित पवार, बाबुराव पाचर्णे, राहुल कुल, दत्तात्रय भरणे हे आमदार, महापालिका आयुक्त सौरभ राव, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

दिवाळीच्या आधीपासून पुण्यावर पाणीकपातीचे संकट होते. ऐन दिवाळीच्या काळात पाणीवाटपाचे फेरनियोजन कपातीमुळेच करण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांचे पाण्याविना हाल झाले. याशिवाय मागील कालवा समितीच्या बैठकीत प्रतिदिन 1,150 एमएलडीच पाणी देण्याबाबत जलसंपदा विभाग ठाम असल्याने पाणीकपातीशिवाय महापालिकेसमोर कोणताच पर्याय राहिला नाही.

मुख्यमंत्र्यांनाही या विषयात साकडे घालण्यात आले. परंतु लेखी आदेश नसल्याने जलसंपदा विभागाने कपात मागे घेतली नाही. तरीही प्रतिदिन 1,350 एमएलडीच पाणी महापालिकेने उचलले.

पुण्याची वाढलेली लोकसंख्या आणि तिची पाण्याची गरज लक्षात घेऊन दररोज 1,350 एमएलडी प्रमाणे वर्षाला 16 टीएमसी पाणी देण्याची मागणी महापालिकेने जलसंपदाविभागाकडे बऱ्याच आधीपासून केली आहे. तीच मागणी पुन्हा एकदा सोमवारच्या बैठकीत केली. मात्र, त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. एवढेच नव्हे, तर रोजच्या जादा पाण्याच्या मागणीबाबतचा निर्णयही महाजन यांनी राखून ठेवला असून, दोन-तीन दिवसांत त्यावर निर्णय देऊ असे सांगितले आहे.

पालकमंत्र्यांची भूमिका “नरो वा कुंजरो वा’ची
यावर्षी 15 % पाऊस कमी झाला असून, यावर्षी खडकवासला संयुक्‍त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्‍न आगामी काळात उद्‌भवू शकतो. यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणीकपाट अटळ आहे, हे अप्रत्यक्षरित्या सांगितले. त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकातूनच हे स्पष्ट होत आहे. कालवा समितीच्या बैठकीतही पालकमंत्र्यांनी प्रतिदिन 1150 एमएलडी पाणी देण्याच्या बाजूनेच भूमिका घेतली. परंतु अन्य आमदार आणि खासदार मात्र ज्यादा पाण्याच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळेच हा विषय अनिर्णित राहिला. खडकवासला संयुक्त प्रकल्पात सध्या 21.39 टीएमसी पाणीसाठा असून तो पुढील 234 दिवस पुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेचे येणाऱ्या काळात पाणी काटकसरीने आणि जपून वापरावे याबाबत धोरण ठरवण्यात आल्याचे बापट यांनी म्हटले आहे.

एका बाजूला पाणीकपात होणार नाही, असे बापट सांगत आहेत आणि दुसरीकडे “काटकसरीने पाणी वापरा’ असेही सांगत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही “नरो वा कुंजरो वा’ असे म्हणणाऱ्या युधिष्ठिरासारखी झाली आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)