पाणीकपातीविरोधात नेत्यांची भूमिका

कालवा दुरुस्तीची मागणी : 72 कोटीची थकबाकी लवकरात

पुणे – पुण्याच्या पाण्याविषयी अन्य नेत्यांनी कपातीच्या विरोधात भूमिका मांडली. त्यामुळे हा निर्णय पुढे घेण्यात आला असला तरी तो टळला नाही, हे निश्‍चित आहे. पाणी कमी करू देणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट वगळता खासदारांसह अन्य आमदारांनी घेतली.

जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेकडे असलेली 72 कोटी पाण्याची थकबाकी लवकरात लवकर देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे बापट यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तसेच बेबी कॅनॉलबाबत त्वरीत दुरुस्ती करावी, धरणक्षेत्रातील गाळ आणि गवत काढण्यात यावे, खडकवासला धरणातून होणारी पाण्याची गळती कमी करावी, पंप लावणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी भूमिका बैठकीत मांडल्याचे या पत्रकात म्हटले आहे. याशिवाय पालिकेनेही वेळेत कामे पूर्ण करावीत, पाण्याचा अपव्यय टाळावा, बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, बेकायदेशीर नळजोडणी बाबत कडक कारवाई करावी, उपलब्ध पाणीसाठा पुनर्जिवीत करावा, अशा सूचना केल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

पुणे महापालिकेचा दैनंदिन पाणीवापर 1,150 एमएलडी पेक्षा अधिक होत असून, तो सरासरी 1,326 एमएलडी इतका येतो. लोकसंख्येच्या प्रमाणात हा पाणीवापर जास्त असल्याचे मत मांडण्यात आल्याचे बापट यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला वारजे या धरणातून पाईपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळेच येणाऱ्या उन्हाळी हंगामामध्ये सिंचन आवर्तने देणे शक्‍य होणार नाही, असे मत मांडण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न येणाऱ्या काळात गंभीर होऊ नये म्हणून पाणीकपातीबाबत धोरण ठरवण्यात येणार असल्याचेही बापट यांनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

आम्हांला प्रतिदिन 1,350 एमएलडीच पाणी हवे : महापौर
उन्हाळी आवर्तनाला पाणी देण्याबद्दल आक्षेप नसून शहराला 1,350 एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी केली. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे, वाढती लोकसंख्या, शहराच्या पाच किमीवरील दिलेले पाणी आणि “फ्लोटिंग पॉप्युलेशन’ ध्यानात घेऊन 50 लाखांपेक्षा जास्त लोकांना पाणी द्यावे लागते. म्हणूनच जास्त पाणी द्यावे; तसेच गेल्या अनेक वर्षांत योग्यरीतीने कालव्याची डागडुजी न झाल्याने बेकायदा पाणी उचलणाऱ्यांवर पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत आहे. शिवाय, मुंढवा जॅकवेलमधून दिल्या जाणाऱ्या पाण्याची मोजदादही केली पाहिजे, अशी भूमिका मांडताना बेबी कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने सोळा कोटी रुपये दिले असले तरी कॅनॉलचे काम कासवगतीने सुरू आहे, असेही महापौरांनी सांगितले.

तसेच पर्वती ते लष्कर पाईप लाईनचे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यामुळे ही पाईपलाईन एक डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कालव्यातून महापालिका एक थेंबही पाणी उचलणार नाही. त्यामुळे त्वरित 100 एमएलडी पाणी वाचणार आहे, याचाही विचार पाटबंधारे विभागाने करावा अशी आग्रही भूमिका महापौरांनी मांडली.

काही भागांत उघडपणे पाण्याची चोरी होते, त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होवून पुणेकरांना देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात होते, अशीही भूमिका मांडण्यात आली.

जलसंपदा विभागाला देणे असलेली महापालिकेची 110 कोटी रुपयांची थकबाकी येत्या मार्चपर्यंत जमा होईल आणि उरलेली 155 कोटींची थकबाकी सहा महिन्यांत महापालिका भरेल, असेही आश्‍वासन महापालिकेतर्फे या बैठकीत देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)