पाणीकपातीला विरोध करण्याचा निर्णय

पाण्यासंदर्भात पुण्यात सर्वपक्षीय बैठक

पुणे – पाणीकपातीचा विषय अधिकच पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, पाण्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. मात्र पाणीकपातीला विरोध करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे.

कमी पाऊस आणि त्या अनुषंगाने पाण्याचा काटकसरीने वापर या पार्श्‍वभूमीवर पाणीकपात करण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यातच पुणे शहरालाही कमी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच, उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता पाणी कपात करावी लागणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी अनेकदा केले होते.

पाणी कपातीवरून शहरात पाण्याचे राजकारण रंगले आणि त्याला विरोध सुरू झाला. जलसंपत्ती नियामक मंडळानेही महापालिकेच्या विरोधात निर्णय दिला. महापालिकेनेही जलसंपदा विभागाकडून मिळणाऱ्या पाणीवाटपाचे फेरनियोजन केले. ऐन दिवाळीत पाणीकपातीचे संकट पुणेकरांवर ओढवले. तसेच अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी महापालिका प्रशासन घेऊ शकते, अशी स्थिती आहे.

त्यावेळी शहरातील अन्य पक्षांचे प्रमुखांबरोबर बैठक घेऊन समन्वयाने निर्णय घेण्यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. मात्र, दिवाळीपासून ही बैठक लांबली. अखेर बुधवारी या संदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना तसे निरोपही महापौर मुक्ता टिळक यांनी पाठवले आहेत. रात्री साडेआठ वाजता न. चि. केळकर रस्त्यावरील लोकमान्य सभागृहात ही बैठक बोलावण्यात आली आहे.

बैठक वादळी ठरण्याची चिन्हे
या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असेल तर आमचा याला विरोध असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी घेतली आहे. कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांचीही हीच भूमिका आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पाण्यासंदर्भातील बैठक वादळी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)