पाणीकपातीबाबत संशयकल्लोळ

पालकमंत्री म्हणतात, “पाणीकपात नाही’


महापौर म्हणतात, “15 टक्के कपातीचा निर्णय’


प्रशासन आणि महापौरांनी केली कपातीच्या वेळापत्रकाची तयारी

पुणे – पुण्याच्या पाणीकपातीबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असून पाणीकपातीबाबत निर्णय झालाच नाही, असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. तर, दुसऱ्या बाजूला “15 टक्के पाणीकपातीचा निर्णय झाला आहे,’ अशी माहिती महापौर तसेच प्रशासन यांनी दिली आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, नक्की पाणीकपात आहे किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे, तर पाणीकपातीबाबतच्या बातम्या निराधार असून त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही बापट यांनी केले आहे.

अशी संभ्रमावस्था निर्माण करून स्वत:ची बाजू सावरण्यासाठी प्रत्येक विभागाकडून प्रयत्न केले जात असून, त्यातूनच अशा बाजू मांडल्या जात आहेत. मात्र “काटकसरीने पाणी वापर करण्याबाबत सगळ्यांचे समान वक्तव्य असल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट आल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाण्याच्या वापरासंदर्भात चर्चा झाली. पुणेकरांना पुन्हा एकदा पाणी काटकसरीने वापरण्यासंदर्भात या बैठकीत सूचना करण्यात आली. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार अजित पवार, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार राहुल कुल, आमदार दत्ता भरणे, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठी झाला नसल्याचे कारण पाटबंधारे खात्याने पुढे केले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या धरणसाखळीत 27 टीएमसी पाणीसाठी असून, दोन टीएमसी पाणी कमी आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या पुण्याच्या पुढील इंदापूरपर्यंतच्या भागाला शेतीसाठी आवर्तन आणि पिण्यासाठी पाणी देणे आवश्‍यक आहे. या भागात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पुढील दहा महिन्यांचे पाण्याचे नियोजन करावे लागणार असल्याने त्यातूनच पुण्याला मिळणाऱ्या 1350 एमएलडी पाणीसाठ्याला किती कात्री लावली हे बापट यांनी स्पष्ट केले नाही. मात्र काटकसरीने “टेल टू हेड’ समान पाणीवाटप झाले पाहिजे ते करतांना शेतकरी समाधानी रहावा आणि पुणे शहरालाही पिण्याचे पाणी द्यावे, याची दक्षता घ्यावी. अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याचा खुलासा बापट यांनी केला आहे.

मात्र प्रशासनाच्या म्हणण्यानुसार…
सद्यस्थितीत महापालिका 1350 एमएलडी पाणी रोज उचलते. त्यातून शहरातील पेठा आणि अन्य काही भागात दोनवेळ पाणीपुरवठा करण्यात येतो. उपनगरे आणि पूर्वभागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येतो. काही भागात या परिस्थितीतही पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. कपातीच्या निर्णयामुळे 1150 एमएलडीच पाणी महापालिकेला उचलावे लागणार आहे. त्यामुळे कमी पाण्यात नियोजन करावे लागणार असल्याने शहरात सर्व भागात दोन वेळा पुरेशा दाबाने आणि पुरेसे पाणी देऊ शकणार नसल्याने एकवेळ पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे महापालिकेतील पाणीपुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.


बापट म्हणतात…
कमी पाऊस झाल्याने यंदा पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी आम्ही “टॉप टू बॉटम’ पद्धतीने कालव्यातील पाण्याचे वितरण करणार आहोत. शेती आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी राखून ठेवण्याचे योग्य नियोजन करीत आहोत. पाण्याची बचत करून आत्तापासून नियोजन करावे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे बापट म्हणाले. परंतु “टॉप टू बॉटम’ नियोजन काय करणार याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. येत्या काही दिवसात आणखी पाऊस झाल्यास परिस्थितीत थोडा बदल होईल. तथापि बेबी कालव्याची पाणी उचलण्याची क्षमता वाढवून पुणे महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा, अशा सूचना या बैठकीत महापालिकेला दिल्याचे बापट म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)