पाडेकरवाडीचा देवदूत नव्हे हा तर जलदूत

शेतजमीनही ओलिताखाली आणणार
शेतीसाठी तारळे धरणातून 5 किलोमीटर पाईपलाईन करून गावची संपूर्ण शेती बागायती करण्याचा विचार सुदाम पवार यांनी बोलून दाखविला आहे. यासाठी तब्बल 80 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्याची तयारी सुरू आहे. या योजनेतून 500 हेकटर क्षेत्र ओलिताखाली येऊन पाडेकरवाडी बरोबरच मालदेव, डोणी व आळी या गावातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच गावातील युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी सुध्दा प्रयत्नशील राहणार असून लवकरच या परिसरात मोठा व्यवसाय उभा करणार असल्याची माहिती सुदाम पवार यांनी ‘दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.

विशाल गुजर

सुदाम पवार यांची जलकथा : महिलांची पायपीट थांबली

पाडेकरवाडी (ता.पाटण) गावची लोकसंख्या अवघी बाराशे पण गाव मात्र दुर्गम आणि डोंगराच्या कुशीत वसलेल. पावसाळ्यात पाणीच पाणी पण मार्च महिना आला की पाण्याची ओढाताण. जवळपास सर्वच महिला डोक्‍यावर हंडे, कळशा घेऊन तब्बल अडीच किलोमीटरची पायपीट ठरलेली असायची. पण यावर्षी मात्र, चित्र बदललंय आणि याला कारणीभूत आहे याच गावचा सुपुत्र सुदाम पवार. सुदाम पवार हे मुंबईतील उद्योग क्षेत्रातील नामांकित नाव पण गावासाठी मात्र देवदूत नव्हे तर जलदूत म्हणावे लागेल.

आपल्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सुदाम पवार यांनी 25 लाख रुपये खर्च करून 80 हजार लीटर पाणी साठवण टाकी बांधून व ते पाणी स्वतंत्र तीन पाईपलाईन मधून संपूर्ण गावाला पुरवून आज गावातील ग्रामस्थांचे जलदूत बनले आहेत.
याबाबतची हकीकत अशी की, पाटण तालुक्‍यातील पाडेकरवाडी या गावात गेल्या कित्येक वर्षात पाण्याची सोय नव्हती. येथूनच जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी (धनगरवस्ति) येथून मार्च महिना सुरू झाला की जून महिन्यातील पाऊस पडेपर्यंत पाणी आणण्याची पायपीट सुरू असायची. गुराढोरांचे हाल तर याहुनही अजूनच वाईट. गावातील सौ. किसाबाई पवार व श्री परशुराम पवार यांच्या पोटी जन्मलेले सुदाम पवार हे मुंबईत वास्तव्यास आहेत. मुंबईत व्यवसायाच्या निमित्ताने कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. पण गावासाठी काही तरी केलंच पाहिजे या भावनेनं प्रेरित होऊन त्यांनी मागीलवर्षी पाण्याची अडचण सोडवण्याचे ठरविले. सुदामा चॅरिटी फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 25 लाख रुपये खर्चाची पाण्याची टाकी बांधून पाईपलाईन योजना राबविली या कामासाठी गावातील 100 हुन अधिक ग्रामस्थांनीही 10 दिवस श्रमदान केले. आणि बघता बघता पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम 17 दिवसात पूर्ण झाले. प्रत्येक घराला पुरेशे पाणी मिळण्यासाठी टाकीपासून गावात स्वतंत्र तीन पाईपलाईन टाकण्यात आली.

प्रत्येक घराला स्वतंत्र नळकनेक्‍शन प्रमाणे 150 नळ बसविण्यात आले असून दोन वेळा भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे गावातील महिलांची पाण्यासाठीची होणारी पायपीट पूर्ण थांबली असून महिलांनी घरातील सांडपाण्यावर परसबागेत मळे फुलवले आहेत. मका, वांगी, कांदे यासह उन्हाळी भाजीपाल्याची पिकं या सांडपाण्यावर घेतली जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)