पाडळीतील शेतकऱ्याचे पक्ष्यांसाठी दातृत्व

अर्धा एकरवरील बाजरीचे पीक राखण न करता ठेवले खुले

चास कमान- कडक उन्हाळ्यात पक्षाची पाण्याची व भुकेसाठी धडपड पाहून पाडळी (ता. खेड) येथील एकनाथ गणपत अरबुज या शेतकऱ्याने अर्धा एकरवरील बाजरीचे पीक पक्ष्यांना खाद्यासाठी खुले केले आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

खेड तालुक्‍यातील चास जवळील पाडळी गावातील एकनाथ अरबुज या शेतकऱ्याने उन्हाळ्यात कमी पाण्यावर ज्वारी, गहू, हरभरा या पिकाचे उत्पादन न घेता अर्धा एकवर बाजरीचे पिक घेऊन पक्ष्यांना अन्नधान्याची व पाण्याची सोय केली आहे. झाडांवरही पाण्याने भरलेले भांडे ठेवली आहेत. या परिसरातील पक्षी बाजरीचे कणसे खाण्यासाठी शेतात दाखल होत आहेत. घरातील उरलेले अन्न सावलीत पक्षासाठी ठेवत आहेत. परिसरातील पाणवठे, बंधारे, तलाव, विहिरींनी तळ गाठले आहेत. त्याच उन्हाची तीव्रता वाढल्याने एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही अन्नधान्य व पाणी मिळत नाही. त्यातच तीव्र उन्हामुळे पाण्यासाठी सध्या पक्षाची धडपड सुरू आहे. किमान गरजेपुरते पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून पक्ष्यांनाही मदत होईल असे काम करणे गरजेचे आहे.

आपल्या घराच्या अवतीभोवती, परिसरात पक्ष्यांसाठी छोटी घरटी तयार करणे किंवा त्यांना निवारा तयार करून देणे गरजेचे असल्याचे अरबुज यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी पक्ष्यांसाठी सोडलेल्या बाजरी पिकामुळे कबूतरे, चिमणी, कावळे, मैना, पोपट, चितुर यांसारखे असंख्य पक्षी ठिकाणी अन्न व पाण्यासाठी येत असल्याने दिवसरभर याठिकाणी पक्ष्यांची किलबिलाट वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)