मोहाली – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत धोनीने झुंजार खेळी करूनही चेन्नई सुपर किंग्जने पंजाबविरुद्धचा सामना केवळ चार धावांनी गमावला. पाठदुखीने सतावल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या लढतीत जबरदस्त खेळी केली. पाठदुखी ही काही पराभवासाठी सबब होऊ शकत नाही, असे धोनीने नमूद केले. या निराशाजनक पराभवानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला की, सामना सुरू असताना माझी पाठ दुखत होती. त्यामुळे फलंदाजी करण्यास त्रास होत होता. वेदना होत असतानाही मी टिच्चून फलंदाजी केली. मात्र विजय मिळवून देण्यात मला अपयश आले. सामन्यात खेळताना माझी पाठ प्रचंड दुखत होती. मात्र, देवाने मला ताकद दिली आहे. त्यामुळे पाठीच्या साहाय्याने मोठे फटके लगावण्याची गरज पडली नाही. माझ्या हातांमध्ये पुरेसे बळ असल्याने मी त्यावर विश्वास ठेवत मोठे फटके लगावले. परिणामी पाठदुखीमुळे माझ्या फटकेबाजीवर परिणाम झाला नाही.
यावेळी धोनीने पंजाबचा गोलंदाज मुजीबचा उल्लेख केला. दोन्ही संघातील हा मोठा फरक आहे असे मत धोनीने व्यक्त केले. पंजाबने चांगली गोलंदाजी आणि सांघिक खेळ केला म्हणून आमचा पराभव झाला. हा सामना अटीतटीचा झाला, ज्यामध्ये पंजाबच्या संघाने आमच्यापेक्षा उत्कृष्ट खेळ केला. आम्हाला आमच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात कामगिरी उंचावावी लागेल. गेलने स्फोटक फलंदाजी केली, त्यानंतर मुजीबने योग्य टप्यावर गोलंदाजी करत दोन्ही संघातील अंतर दाखवून दिले, असे सांगून धोनी म्हणाला की, 20 षटकांच्या सामन्यामध्ये 190 पेक्षा जास्त धावा आम्ही केल्या. पण आम्हाला मुजीबच्या गोलंदाजीवर धावा करता आल्या नाहीत. मुजीबने तीन षटकांत केवळ 18 धावा दिल्या आणि आमच्या फलंदाजावर अंकुश ठेवला. तसेच उजव्या व डावखुऱ्या फलंदाजांचे कॉम्बिनेशन असल्यास गोलंदाजांना मारा करण्यात अवघड जाते. हा विचार करून जडेजाला ब्राव्होपूर्वी फलंदाजीस उतरविले होते. दुर्दैवाने हा बदल यशस्वी ठरला नाही.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा