नारायणगाव – नारायणगाव येथील पाटे खैरे मळ्यात आज (दि. 3) पहाटेच्या सुमारास नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. पाटे खैरे मळ्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. जुन्नर वन विभागाने नागपूर वन विभाग कार्यालयांकडून परवानगी घेऊन आठ दिवसांपूर्वी पाटे खैरे मळ्यात सावंत यांच्या शेताजवळ पिंजरा लावला होता. आज सकाळी 7 च्या सुमारास वन मजूर खंडू भुजबळ हे पिंजरा तापसण्यासाठी गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालेला आढळून आला. ही माहिती त्यांनी वनपाल मनीषा काळे यांनी दिली. काळे आणि वनरक्षक कांचन ढोमसे यांनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि जुन्नर विभागाचे वन संरक्षक अर्जुन म्हसे यांना माहिती देऊन नर जातीचा असलेला 7 ते 8 वर्षीय बिबट्याला माणिकडोह निवारण केंद्रात दाखल केले आहे. नारायणगाव परिसरातील पाटे खैरे मळा, खडकवस्ती, नारायणगाव बाह्य वळण, नारायणवाडी, खडद रोड या परिसरात उसाची शेती जास्त आहे. अजूनही या परिसरात 2 ते 3 बिबटे मादीसह असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी खोडद रोड वरील अनूज गोल्डन या सोसायटीमध्ये रात्री काही महिला सोसायटीमध्ये जात असताना एक बिबट्या दिसला होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा