पाटसची ग्रामसभा साडेतीन तास गाजली

सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामस्थांनी धरले धारेवर

वरवंड- पाटस गावची ग्रामसभा सोमवारी (दि. 27) सुमारे 3 तास 30 मिनिटे विविध मुद्द्यांवरून गाजली. यात गावातील पाणीपुरवठा योजनेवरून चांगलाच गदारोळ झाला. ग्रामसभेत अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच वैजयंता म्हस्के होत्या . यावेळी ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड , उपसरपंच आशा गोरख शितोळे, पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे, घनश्‍याम चव्हाण यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. पाटस गावात सुमारे पाच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असूनही गावातील सर्वच भागात पाणीपुरवठा का केला जात नाही ? पाणीपुरवठा सर्व गावात होण्यासाठी ग्रामपंचायत कोणत्या ठोस उपाययोजना करणार आहे, याबाबत नितीन शितोळे यांनी प्रश्‍न उपस्थित केले. पाणीपुरवठा योजनेचे पाणी जोपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचले जात नाही, तोपर्यंत पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये, अशी मागणी दादासाहेब भंडलकर यांनी केली.

पाटस गावातील काही गृह-प्रकल्प, मंगल कार्यलये नोंदी अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये केल्या नसल्याने लाखोंचे नुकसान होत आहे. नसणाऱ्या बांधकामांच्या नोंदी न करण्यात आल्याने ग्रापंचायतीचे उत्पन्न बुडत आहे. आशा नोंदी नसणाऱ्या बांधकामांची मोजणी करण्याचे काम गेले काही महिने सुरू असूनही हे काम अजूनपर्यंत पूर्ण का नाही झाले? नोंदी नसणारे बांधकामांनाही पाणी ड्रेनेज रस्ते अशा सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत आणि जे नागरिक व्यवस्थित कर भरतात त्यांना या सोयी का नाहीत असाही प्रश्‍न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला. नोंदी नसणाऱ्या सर्व बांधकामांना घरपट्टी सुरू करा नाहीतर सगळ्यांच्याच घरपट्टी माफ करा, असेही मत काही ग्रामस्थांनी मांडले. नोंदी लावण्यास दिरंगाई का होते यावरून सचिन शितोळे, जाकीर तांबोळी यांसह ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आशा बांधकामाची मोजणी करून नोंदी लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.ग्रामसभेत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडली तसेच ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांवर कोणतीच ठोस कार्यवाही का होत नाही? गावातील कानगाव रस्त्यालगतची पोलीस ठाणे ते प्राथमिक शाळेपर्यंतची जागा ही ग्रामपंचायतच्या विकासासाठी ठेवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करण्यात येऊ नये, या जागेवर ग्रामपंचयतीची पाटी लावण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संभाजी चव्हाण यांनी केली.तालमीसाठी कित्येक दिवस मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून पाणी आणि लाईटची व्यवस्था करण्यात येत नसल्याचे म्हणणे भानुदास भंडलकर यांनी मांडले
भागवत वाडी येथील शाळेस पाणीपुरवठा करण्याचे गेल्या वेळेस ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी दिले होते; परंतु अजूनही भागवत वाडीच्या शाळेस पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही, याबाबत जाकीर तांबोळी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस जाब विचारला. तसेच दहा दिवसांच्या आत गावातील भागवतवाडी म्हस्केवस्ती आणि घोलेवस्ती येथील शाळांना पाणीपुरवठा सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पाटस गावच्या बाजारात शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना कडून बाजाराची पावती घेण्यात येऊ नये अशी मागणी शिवाजी ढमाले आणि सुधीर पानसरे यांनी केली .

  • कंपनीस परस्पर परवानगी कशी दिली?
    गावातील श्री सिमेंट कंपनी आणि इतर कंपन्यांना परवानगी देण्याबाबतच्या मुद्द्यावरून ग्रामसभेत मोठाच गदारोळ झाला. कंपनीच्या मुद्द्यावरून सरपंच यांनी परस्पर कंपनीसोबत करार कसा केला? कंपनीस ना हरकत प्रमाणपत्र दिले का? कोणत्याही नवीन कंपनीस परवानगी देण्यापूर्वी तो विषय ग्रामसभेत मांडण्यात यावा व सर्व ग्रामस्थांच्या परवानगीनेच कंपनीस परवानगी देण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत होऊन देखील सरपंच व ग्रामसेवक यांनी परस्पर कंपनीस कशी परवानगी दिली असा प्रश्‍न शिवाजी ढमाले यांनी उपस्थित केला.
  • दोन मोटारी चोरीस कशा गेल्या?
    पाटस ग्रामपंचायतीच्या कालव्यामधून तीन मोटारींद्वारे पाणी उपसा करण्यात योतो मात्र, त्यातील दोन मोटर कशा चोरीला गेल्या? मोटर चोरीला गेल्याची पोलिसात तक्रार का दिली नाही असा प्रश्‍न दादासाहेब भंडलकर यांनी उपस्थित केला? ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी ग्रामसभेत केली.
  • सहा लाख लिटर पाणी जाते कुठे?
    पाणीपुरवठा योजनेचे सहा लाख लिटर पाणी दोन तासात जाते कुठे ? सर्वांना पाणी का पोहोचवले जात नाही? पाणीपुरवठा योजनेचे सरसकट बिले घेतली जातात मग नळांना मीटर का बसवण्यात आले होते, याबाबत चौकशी करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून या ग्रामस्थांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)