पाटबंधारे विभागामुळे कृत्रिम जलसंकट

सजग नागरिक मंचाचा आरोप : शेतीसाठी जॅकवेलचे पाणी द्या

पुणे- खडकवासला धरणसाखळीत 85 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा असतानाही शहरात पाणी-बाणी स्थिती निर्माण होण्यामागे पाटबंधारे विभागच जबाबदार असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने सांडपाणी शुध्द करून नदीत सोडलेले पाणी शेतीला देण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्चून मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारला आहे. यातून पाटबंधारे विभागाने दरवर्षी साडेसहा टीएमसी पाणी घेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी साडेतीन टीएमसीच पाणी शेतीसाठी घेतले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पिण्यासाठीचे पाणी सिंचनासाठी जात असून शहरावर कपातीची वेळ ओढावल्याचा दावा मंचाने केला आहे.

शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका आणि जलसंपदा विभागात झालेल्या करारानुसार, शहरात निर्माण होणारे सांडपाणी महापालिकेने शुद्ध करून ते मुंढवा जॅकवेल प्रकल्पाद्वारे बेबी कॅनॉलच्या माध्यमातून सिंचनासाठी द्यायचे आहे. वर्षाला सुमारे साडेसहा टीएमसी पाणी या कालव्यातून घेतले जाणार होते. त्यामुळे आपोआप खडकवासला धरणातून सिंचनासाठी केल्या जाणाऱ्या पाणी साडेसहा टीएमसीने वाचणार होते. हे पाणी शहरासाठी देणे आवश्‍यक होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मिळून पाटबंधारे विभागाने जॅकवेलमधून साडेसहा टीएमसी पाणी उचलले आहे. त्यामुळे धरणातील पाणी शेतीसाठी जात असल्याने पुणे शहरास पाणी कमी पडत असल्याचा दावा मंचाने केला आहे.

बेबी कालव्याची दुरवस्था
सजग नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुंढव्यापासून ते केडगावपर्यंत बेबी कालव्याची पाहणी केली. यात कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे समोर आले. तसेच पाटबंधारे विभागानेही गेल्या कित्येक वर्षांत ही दुरूस्तीच केली नसल्याचे चित्र आहे. यवतपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर खुटबाव येथे दगड-मातीमुळे हा कालवा भरून जाऊन बुजल्याचे या पाहणीत दिसून आले. त्यामुळे येथून पाणी पुढे जातच नाही. त्या पुढे तर केडगावच्या अलिकडे या कालव्यातून पाणीच वाहत नसल्याने कालव्यातच पाइप टाकून भराव टाकून कच्चा रस्ताही बांधल्याचे या पाहणीत समोर आले आहे.

जलसंपदामंत्र्यांना पत्र
केवळ पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे ही वेळ ओढावली असून हा कालवा तातडीने दुरूस्त करून शेतीसाठी शुद्ध केलेले सांडपाणी घेऊन पुणेकरांना कपातीमध्ये दिलासा द्यावा, अशी मागणी मंचाने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)