पाटबंधारे विभागाचे महापालिकेला पत्र

पुणे – शहरातील नद्यांच्या पूररेषेच्या आतील अतिक्रमणे महापालिकेने काढावीत, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठवले आहे. या बांधकामांमुळे पूररेषा बाधित झाली असून, अतिवृष्टीच्या काळात जिविताला धोका निर्माण होऊ शकतो, असेही यात म्हटले आहे.

मे अखेरपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी सुरू केली असून, नदीच्या कडेने आणि नदीपात्रात राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरामध्ये सुमारे 42 किलोमीटर मुठा नदीचा प्रवाह आहे. या नदी पात्रात पूर आल्यास दुर्घटना घडू नये यासाठी कोणत्याही प्रकारचा भराव टाकण्यास परवानगी नाही. त्यासाठी 1989 मध्ये अध्यादेशही काढण्यात आला आहे. मात्र तरीही बेकायदा सपाटीकरण वेगाने सुरू आहे. स्थानिकांनी अखेर आयुक्तांकडे तक्रार केल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणात पुढे काहीही प्रगती झाली नाही. अखेर पाटबंधारे विभागाने पत्र पाठवल्यावर तरी महापालिकेला जाग येणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.
याच विषयावर खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या सहीने आयुक्त कुणालकुमार यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये कर्वेनगर भागातील मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, पूर रेषेच्या आता राडारोडा टाकून भराव करून सपाटीकरण करण्याचे काम काही खासगी लोकांकडून होत असल्याचा हवाला देण्यात आला आहे. या प्रकारामुळे पूर रेषा बाधित झाली आहे. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येऊन पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात पूर नियंत्रण करण्याला अडचण निर्माण होणार आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यकाळात आपत्कालीन पूर परिस्थिती आणि वित्त हानी टाळण्यासाठी पूररेषेच्या आतील बांधकामे आणि भराव काढून टाकण्याची कार्यवाही महापालिकेने तात्काळ करावी असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)