पाटण पोलिसांची प्रतिमा अधिकच मलिन

पाटण पोलिस स्टेशनचे दोन पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात लाच घेताना अडकले. ही बाब खरोखर लाजिरवाणी आहे तर चोराला सोडून संन्याशाला धरणे हा प्रकार पाटण पोलिसांनी थांबवला पाहिजे. भ्रष्टाचारासारखे प्रकार तर तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. अन्यथा पाटण तालुका शिवसेनेच्यावतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल. सुरेश पाटील अध्यक्ष, पाटण तालुका शिवसेना.

किशोर गुरव

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी लक्ष देण्याची गरज

मोरगिरी – पाटणच्या जनतेच्या मनात अगोदरच पाटण पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत फारशी चांगली प्रतिमा नव्हती. असे अनेक वेळा वेगवेगळ्या चर्चेतून ऐकायला मिळत होते आणि त्यातच काही दिवसापूर्वी पाटण पोलिस स्टेशनचे दोन पोलिस कर्मचारी 2 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. या कारनाम्याने पाटण पोलिसांची प्रतिमा अधिकच मलिन होवून पाटण पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे.

पाटण पोलिसांच्या बाबतीत पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असेही बोलले जात आहे. पाटण पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय राक्षे व पोलिस नाईक कुलदीप कोळी हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. ही बातमी पाटणसह तालुक्‍यातील वेगवेगळ्या विभागात वेगाने पसरत होती, जेवढ्या वेगाने बातमी पसरत होती, तेवढ्याच वेगाने अनेक जणांना आनंद होत होता. खरं तर दोन पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात अडकतात आणि काही जणांना आनंद होतो ही एक आश्‍चर्यकारक गोष्ट होती. मात्र त्याचे असे की हवालदार संजय राक्षे व पोलिस नाईक कुलदीप कोळी हे दोन साहेबांचे शिलेदार आहेत अशी चर्चा कायमच ऐकायला मिळत होती आणि त्यांनी त्यांची ओळखही तशीच निर्माण केली होती. तालुक्‍यातील मोरणा विभागात सुरु असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्प आणि यातील रत्नागिरी विंड कंपनीची वाहने गोकुळपासून घेऊन जात असताना होत असलेला शेतकऱ्यांचा विरोध कसा मोडीत काढला हे मोरणा विभागातील जनतेला चांगलेच माहित आहे. तर विभागातील मटका धंदेवाले, अवैध दारु धंदेवाले यांना मोरगिरीतून नेरळे गोंड इथपर्यंत घेऊन जायचे आणि तिथे त्यांना दहा पंधरा मिनिटे थांबवायचे आणि परत सोडून द्यायचे म्हणजे नक्की काय? मोरगिरी-पाटण चालू असणारे वडाप याचे हप्ते गोळा करण्याचे महत्वपूर्ण काम या महाशयाकडेच होते, असेही ऐकायला मिळत होते. एखाद्या गाडीचा हप्ता थांबला की त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच म्हणून समजायची. असे हे पोलीस जबाबदारीने आपले प्रामाणिकपणे काम पार पाडत होते. त्यांच्या कर्तव्यदक्ष कामाला खरोखरच काहीजण कंटाळले होते. म्हणूनच हे कुलदीप कोळी महाशय लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले हे समजले की, अनेक जणांना आनंद झाला.

पाटण पोलिसांच्या अशा अकार्यक्षमतेबाबत अनेक अनुभव पाटणसह तालुक्‍यातील जनतेने अनेकवेळा घेतले आहेत. लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या या दोन पोलिसांच्या निमित्ताने हे सर्व प्रकार उघड्यावर आले आहेत. आता तरी सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिकारी संदीप पाटील यांनी आपली वक्रद्रुष्टी पाटण पोलिसांवर फिरवावी अशी मागणी पाटणसह परिसरातील जनतेतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)