पाटण तालुक्‍यात वळीवाचा पाऊस

काळगावात पावसाची दमदार हजेरी
काळगाव व परिसरात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारपासून पावसाने दमदार हजेरीस प्रारंभ केला. या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे. वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे शिवारात झाडे उन्मळून पडले. तर, काही ठिकाणी इमारतीवरच्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या टाक्‍या कोसळल्या.

आंबा पीक व वीट भट्टींचे लाखोंचे नुकसान
कराड-पाटण मार्गावर एकेरी वाहतूक

कराड – पाटण तालुक्‍यात पाटण शहरासह कोयना, नवारस्ता, मल्हारपेठ, चाफळ, मणदुरे, मोरगिरी परिसराला सोमवारी दुपारी सुमारे दोन तास वळीवाच्या व गारांच्या पाऊस झाला. तसेच कराड तालुक्‍यात मसूर विभागात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने आंबा पिकांसह वीट भट्टीचे मोठे नुकसान झाले.
सोमवार हा पाटणचा आठवडा बाजारचा दिवस असल्याने अचानकपणे वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या जोरदार पावसाने बाजारकरूंची अक्षरशः दैनाच उडाली. वाऱ्यामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानाची पाले उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. पाटण तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता वाढली होती. उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत होती. गेल्या दोन दिवसांपासून तर दिवसभर आकाश ढगाळलेले राहत आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले असतानाच सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. गारांच्या वर्षावाने या पावसाला सुरवात झाल्याने बालगोपाळांसह नागरिकांनी ही गारांचा आनंद घेतला. अचानकपणे सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

पावसामुळे कराड पाटण रस्त्यावर एकेरी वाहतूक
वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या या पावसामुळे कराड-पाटण रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. अडुळ, मल्हारपेठ, नवारस्ता, नाडे या विभागातसुद्धा अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)