पाटण तालुक्‍यात मागेल त्याला शेततळे योजना कुचकामी

 

सूर्यकांत पाटणकर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटण, दि. 12 – राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे योजना तालुक्‍यात कुचकामी ठरत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये अनुदानाच्या चौपट खर्च होत असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करुन शेततळे याचे काम पूर्ण करावे लागत आहे. त्यामुळे डोंगरी तालुका म्हणून ओळखणाऱ्या पाटण तालुक्‍यात मागेल त्याला शेततळे योजना कुचकामी ठरत आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला शास्वत पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष करुन ज्या ठिकाणी शेतीला पाण्याचा कायम स्त्रोत्र उपलब्ध नाही. अशा ठिकाणी शेततळ्याची योजना सुरु केली. सुरुवातीस काही जिल्ह्यापुरती असणारी योजना राज्य शासनाने संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधानही व्यक्‍त केले. सखल भागामध्ये ही योजना राबविण्यासाठी विशेष खर्च होत नसल्याने त्या भागातही योजना फलदायी ठरली आहे. शेततळ्याच्या आकारानुसार सुमारे 26 हजारपासून ते 50 हजार रुपयापर्यंत अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.

मात्र डोंगरी व दुर्गम असणाऱ्या तालुक्‍यात मात्र ही योजना कुचकामी ठरत आहे. मागेल त्याला शेततळे ही महत्वकांक्षी योजना सुरु करुन शासनाने शाश्‍वत शेतीद्वारे शेतकऱ्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिली आहे. मात्र पाटण तालुक्‍यासारख्या दुर्गम तालुक्‍यात योजना राबविणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असा अनुभव शेतकऱ्यांचा आहे. डोंगर उतारावर खडकांचे प्रमाण जास्त आहे. जांबा अथवा काळ्या खडकाचे प्रमाण जमिनीमध्ये जास्त असल्याने शेततळ्याच्या खोदकामासाठी जास्त खर्च येत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 30 बाय 30 मीटरच्या शेततळ्यासाठी शासनाच्या निकषानुसार खोदकाम करावयाचे असल्यास सुमारे 3 लाख रुपये खर्च येत असून शेतकऱ्यांना अनुदान मात्र केवळ 50 हजार मिळत आहे. त्यामुळे अतिरिक्‍त खर्च शेतकऱ्यांना यांना करावा लागत आहे. तालुक्‍यात झालेल्या शेततळ्यांची आकडेवारी पाहिली असता अगदी नगण्य शेततळ्यांची कामे झालेली पहावयास मिळतात. अनुदानाच्या तुलनेत खर्च अधिक होत असल्याने शेततळ्याचा खर्च शेतकऱ्यांना पेलवणार नाही. त्यामुळे शासनाने मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

तालुका कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यात 25 एवढ्या शेततळ्यांची कामे चालू असून 12 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर जमिनीवरील अस्तरीकरणासाठी लागणाऱ्या कागदाची बाजारपेठेतील किंमतही जास्त आहे. आकारानुसार असणाऱ्या कागदासाठी शेतकऱ्यांना नाममात्र अनुदान उपलब्ध आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र कागदाचा खर्च परवडणार नसल्याने काही शेततळी अपूर्ण आहेत. अपूर्ण असलेल्या शेततळ्यांना शासनाचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेती सुधारण्याच्यादृष्टीने पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना करत येत नाही शासानाने या योजनेसाठी असणारे अनुदान वाढवावे तसेच विस्तारीकरणाच्या अनुदानातही वाढ करावी.

 

स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा

पाटण तालुक्‍यात शेततळी काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येत आहे. अनुदानाच्या तुलनेत होणार खर्च जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना तो परवडत नाही. त्यासाठी शासनाने निकषात बदल करुन अनुदान वाढवावे. अन्यथा या कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

 

शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अनुदानाच्या रक्कमेत वाढ करावी. तुटपुंज्या अनुदान देऊन शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. 30 बाय 30 शेततळ्यासाठी मला सुमारे 3 लाख रुपये खर्च आला आहे. शेततळे काढण्यासाठी शासनाचे निकष जास्त आहेत. त्यामुळे शासनाच्या चौकटीत शेततळे पूर्ण करणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही
अशिष देसाई, शेतकरी मणेरी.

 

मागेल त्याला शेततळे योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी देण्यात येते. 30 बाय 30 शेततळ्यासाठी 50 हजार अनुदान देण्यात येते. तर लहान 15 बाय 15 साठी 22 हजार 500 अनुदान देण्यात येते. तालुक्‍यातील भौगोलीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना खर्च जास्त येत आहे. तर दीड एकर क्षेत्राची अट असल्याने अल्प भूधारक शेतकरी या निकषात बसत नाही. त्यामुळे तालुक्‍यात शेततळे मागणी असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे.
बी. एस. बुधावले, प्रभारी कृषीअधिकारी पाटण.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)