पाटण तालुका राजकीय वार्तापत्र

पाटण  – विधानसभा निवडणुकीसाठी पाटण तालुक्‍यात राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. गटातील नाराज कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेवून देसाई-पाटणकर गटांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही गट सज्ज झाले आहेत. त्यामुळे पाटणमध्ये लोकसभा निवडणुकी आधी विधानसभेचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे.

राजकीदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीची तयारी देसाई-पाटणकर गटांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्‍यात आणले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक विकासकामे करुन कर्तृत्व सिद्ध केले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीशी शक्‍ती उभी करुन त्यांनाही विधानसभेत पाठवा असे अवाहन त्यांनी केले. खा. शरद पवार यांच्या या विधानाने कार्यकर्तेही चार्ज झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीत युवा नेत्यांच्या विजयासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी ही विधानसभा निवडणूक मनावर घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमदार शंभूराज देसाई यांचा पराभव करायचा असे ठरवून त्यांनी देसाई गटातील शिलेदारांचे राष्ट्रवादीत इनकमिंग चालू केले आहे. आमदार देसाईंचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या मोरणा विभागातील युवकांचा पक्षप्रवेश घेवून सुरुवात केली आहे. तर मल्हारपेठ विभागातील विहे गावचे सरपंच यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यात त्यांना यश मिळाले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. तालुक्‍यात शिवसेना व भाजपाची सत्ता आल्यास मंत्रीपदाची माळ आमदार देसाई यांच्या गळ्यात पडणार आहे. यासाठी आमदार देसाई यांचे समर्थकही कामाला लागले आहेत. तालुक्‍यात नरेंद्र पाटील यांची साथ देसाई यांनाच असणार हे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र त्यांची भूमिका तालुक्‍यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना कितपत रुचणार हे महत्वाचे आहे.

तालुक्‍यात आमदार देसाई यांनी विकासकामांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची बांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यातील गावांमध्ये विकास कामांसाठी निधी देऊन त्यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. माणगाव, शिरळ याठिकाणी राष्ट्रवादीचे कार्येकर्ते देसाई गटात घेतले आहेत. राष्ट्रवादीचा प्रभाव असणाऱ्या गावातील वाड्या-वस्त्यांवर त्यांनी विकास कामांचे भुमिपूजनाचा सपाटा लावला आहे. कोयना विभागाला सेनेचे जिल्हाध्यक्षपद देऊन बेरजेचे राजकारण केले. तारळे-ढेबेवाडी विभागात पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना व भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आघाडीचा फायदा राष्ट्रवादीला होणार हे निश्‍चित आहे. मात्र भाजपा व शिवसेनेच्या स्वबळाचा तोटा आमदार देसाई यांना होऊ शकतो. मात्र तालुक्‍यातील मातब्बर मंडळींना सोबत घेवून निवडणूक लढण्याचे दोघांचेही प्रयत्न सुरु आहेत. कुंभारगाव गटातील संजय देसाई हे नाराज असल्याचे समजते. तर कॉंग्रेसच्या राहुल चव्हाणांना युवा नेत्यांनी सोबत घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी विधानसभा निवडणुकीला महत्व आले असून तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे.

काकांचा पाठिंबा तर बाबांचा आघाडीधर्म?
सुपने-तांबवे विभागात माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांची साथ आमदार देसाई यांना मिळणार आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी आघाडीधर्म पाळणार असल्याने याठिकाणी राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)