पाटण तालुका पर्यटनाचा आयडॉल ( भाग1)

सुर्यकांत पाटणकर

सह्याद्रीच्या पर्वत रांगात विखुरलेल्या आणि विसावलेल्या पाटण तालुक्‍यात निसर्गाने मुक्‍तपणे उधळण केली आहे. तालुक्‍यातील कोयना धरण व वीजनिर्मितीमुळे महाराष्ट्र राज्याला ओळख दिली आहे. निसर्गाच्या अविष्कारामुळे भविष्यात तालुक्‍याचा पर्यटनातून सर्वांगिण विकास साधण्यावर भर राहील. तालुक्‍यातील ऐतिहासिक स्थळे, तीर्थक्षेत्रांचा व नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन केल्यास हा वारसा तालुक्‍याचे वैभव ठरणार आहे. पर्यटनांतून विकास या संकल्पनेमुळे भविष्यात तालुका पर्यटनाचा आयडॉल ठरेल, हे नक्की.

पाटण तालुक्‍याची कोयना धरण व वीजनिर्मितीमुळे तसेच पवनऊर्जा प्रकल्पामुळे राज्याला ओळख झाली. राज्यात वीज निर्मितीच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या या तालुक्‍याच्या माथी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अभयारण्यग्रस्त आशा उपाधी लागल्या असल्या तरीही राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचे काम पाटण तालुक्‍याने केले आहे. कोयना धरण परिसरासह तालुक्‍यात वाढणाऱ्या पर्यटनामुळे हा परिसर पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

महाराष्ट्राच्या नकाशावर पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या या मध्यावर सह्याद्रीच्या पर्वत रांगात पाटण तालुका विसावला आहे. कोयना धरण व जलविद्युत प्रकल्पाने पाटण तालुक्‍याची ओळख संपूर्ण जगाला झाली. याच धरणातील जलाशयात लेकटॅपिंगच्या सहाय्याने बोगद्यामार्गे पाणी वाहुन नेवून वीजनिर्मिती केली जाते. तर पवनऊर्जा प्रकल्पातून सुमारे चारशे पन्नास मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे पाटण तालुक्‍याच्या डोंगर पठारावर असणारा पवनऊर्जा प्रकल्प ही आशिया खंडात ओळखला जातो. सात खोऱ्यांमध्ये विखुरलेल्या या तालुक्‍यावर निसर्गाने मुक्‍त उधळण केली आहे.कोयनेचा अथांग पसरलेला शिवसागर जलाशय, काठी अवसरी पॉंईट, लहान मोठ्या टेकड्या, हिरवेगार डोंगर, केरा, कोयना, मोरणा, तारळी, वांग अशा वाहणाऱ्या नद्या तालुक्‍याच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

पाटण तालुका पर्यटनाचा आयडॉल ( भाग 2)

 

कोयना अभयारण्य व त्याच परिसरात होवू घातलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी उपयुक्‍त ठरणार असल्याने शासनाने पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वनकुसवडे, मोरणा, ढेबेवाडी या पठारांवर फिरणाऱ्या पवनचक्‍क्‍यांच्या पाती डोंगरपठारावरील निसर्ग सौदर्यात आणखीनच भर घालत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्यादृष्टीने विचार केल्यास तालुक्‍यात पर्यटन विकासाला हातभार लागू शकतो. पर्यटनाच्या संकल्पना राबविण्यासाठी या ठिकाणी पोषक वातावरण आहे. पावसाळ्यातील कोसळणारे धबधबे, हिरवागार परिसर, तर कोयनेला जाताना रस्त्याच्या दुतर्फा लागणारी हिरवीगार वनराई, जवळूनच वाहणारी कोयना नदी यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होतो.

तालुक्‍यात असणाऱ्या धारेश्‍वर, चाफळ, नाईकबा, जळव, येराड, निवकणे येथील जानाई मंदिर ही प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्रावण महिन्यात पर्यटकांनी गजबलेली असतात. तर घेरादातेगड, भैरवगड, गुणवंतगड यासह लहान- मोठे किल्ले तालुक्‍याच्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देत आहेत. मोरणा गुरेघर, तारळी, उत्तरमांड, वांग मराठवाठी हे मध्यम प्रकल्प तर निवकणे, साखरी चिटेघर, बिबी हे लघु प्रकल्प शेतीसाठी वरदान ठरत आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भेटीचे स्मारक म्हणून नेहरु गार्डन ही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कोयना धरणातील शिवसागर जलाशय पसरलेला काठी आवसरी (के टु पॉईंट) ही पर्यटन म्हणून नव्याने विकसित होत आहे. पाटण येथून जाताना रस्त्याच्या दुतर्फा पठारावर असणाऱ्या पवनचक्‍क्‍यांचे मनोहरी चित्र पर्यटकांना आकर्षित करतात. तर या ठिकाणाहून जवळच असणारे पुरातन पद्‌मावतीचे मंदीर आहे. तर अगदी जवळच ठोसेघर धबधबा आहे. विस्तीर्ण पसरलेल्या या जलाशयाच्या काठावर पळासरी येथे पर्यटकांना जाता येते तर मनसोक्‍त कोयना जलाशयातील पाण्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी पर्यटकांसाठी कृषी पर्यटन, स्टे होम, यासारख्या संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील पर्यटनाचे नवे दालन या ठिकाणी निर्माण होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)