पाटण तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा

पाटण : तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेला सर्वपक्षीय मोर्चा.

पीडित मुलीला न्याय द्या : पोलीस पाटील संतोष विचारेला फाशी द्या
पाटण, दि. 4 (प्रतिनिधी) – नराधम संतोष विचारे याने पीडित मुलीवर अत्याचार करुन अतिरेक केला आहे, त्याला पाटण पोलिसांनी पाठीशी न घालता जास्तीत-जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संतोष विचारे वर राजकीय वरदहस्त असून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय. तेव्हा विचारे याला फाशी झाली पाहिजे, या मागण्यांसाठी कोयना विभागातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि महिला वर्ग यांनी गुरुवारी पाटण तहसीलवर मोर्चा काढला.
पोलीस पाटील संतोष विचारे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून त्याला पाटण पोलिसांनी गुन्हा नोंद करुन सुध्दा लवकर अटक केली नाही. त्यामुळे महिला संघटनांनी आक्रमक होऊन आंदोलने केली. अखेर पाटण पोलिसांनी संतोष विचारे यास ताब्यात घेऊन अटक केली. तरी सुध्दा विचारे यास जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी. तसेच त्याचे पोलीस पाटील पद रद्द व्हावे, यासाठी सर्व कोयना विभाग एकवटला आहे.
गुरुवारी नवीन पंचायत समितीपासून मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चात नाव गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संतोष विचारेस फाशी द्या, अशा घोषणा देण्यात येत होत्या. पाटण तहसील कार्यालय येथील गेटवर पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार म्हणाले, नराधम संतोष विचारे यास जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्याचे पोलीस पाटील पद रद्द व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करु. उपसभापती राजाभाऊ शेलार म्हणाले, तो नराधम जरी आमचा कार्यकर्ता असला तरी असल्या भेकडांचा राष्ट्रवादी पक्ष कधीच पुरस्कार करत नाही. तो पोलीस पाटील झाल्यानंतर आमचा कार्यकर्ता राहिला नाही. त्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचा आम्ही कधीही विचार सुध्दा केला नाही.
जयवंतराव शेलार म्हणाले, संतोष विचारे यास कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेच्या नीलमताई गोरे या पाटण येथे येत आहेत. तेव्हा त्याला या पापाचे प्रायश्चित दिल्याशिवाय कोयना विभागातील माता-भगिनी व सर्व कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत.
यावेळी नायब तहसीलदार विजय माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुखसुरेश पाटील, रवींद्र पाटील, नाना गुरव, नंदकुमार सुर्वे, किशोर भिंगार्डे, हरीष भोमकर, अशोकराव पाटील, बबन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)