पाटण तहसीलदारांच्या अधिकारावर गदा

पाटण – पाटण तालुक्‍यात प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचारी यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे तहसील कार्यालयातील कामकाजाचा अक्षरश: फज्जा उडाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसिलदारांकडून गौण खनिज, कुळकायदा व वतनी जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच एकमेकांवर केलेल्या तक्रारींवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन नायब तहसिलदारांच्या बदल्याही केल्या आहेत.

पाटण महसूल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अतंर्गत मतभेद आहेत. वेळेत काम होत नसल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी लोकांचा वेळ व पैसा खर्च होवून त्यांची विनाकारण ससेहोलपट होत आहे. तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून सातबाऱ्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करताना खातेदारांची दमछाक होत होती. तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यात समन्वय नव्हता.

तहसीलदार व नायब तहसिलदारांतील वाद व मतभेद चव्हाट्यावर आला होता. त्यातून नायब तहसिलदारासह कर्मचारी वारंवार दीर्घ रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले होते. अधिकारी व कर्मचारी यांच्यात संवाद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचे प्रकार वाढले होते. कुळकायदा, वतनी जमीन यांच्या परवानगीसाठी खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींचा खच पडला होता.

यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी नायब तहसीलदार राजेश जाधव यांची सातारा मुख्यालयात व विजय माने यांची कराड प्रांताधिकारी कार्यालयात तडकाफडकी बदली केली आहे. तर पाटणच्या तहसिलदारांकडून गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत. ते अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमिनीच्या परवानगी व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना केलेली दिरंगाई तहसिलदारांना भोवल्याची चर्चा तालुकाभर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)