पाटण कृषी विभागाचा कारभार “रामभरोसे’

सूर्यकांत पाटणकर

पाटण – राज्य शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असणारा पाटण तालुक्‍यातील कृषीविभागाचा कारभार सध्या ठप्प आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होताना दिसतात. मात्र या कृषी कार्यालयात कृषीअधिकाऱ्यांसह विविध पदे रिक्‍त आहेत.त्यामुळे तालुक्‍यात कृषीविभागाची कोणतीही योजना चालू नसून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तालुका कृषीअधिकारी म्हणून कार्यभार घेतलेले प्रविण आवटे यांना झालेल्या मारहाणीमुळे त्यांनी कोल्हापूर याठिकाणी बदली करुन घेतली. त्यानंतर चार महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी कायमस्वरुपी तालुका कृषीअधिकारी या कार्यालयाला मिळाला नाही. त्यामुळे कृषीअधिकारी या पदांसह मंडल कृषीअधिकारी, सुपरवायझर, कृषीसहाय्यक यांची पदे रिक्‍त आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटण तालुक्‍यात पाटण, मल्हारपेठ, तारळे, ढेबेवाडी अशी चार प्रमुख मंडल कृषीकार्यालये आहेत. मात्र या कार्यालयात कायमस्वरुपी एकही मंडल कृषीअधिकारी नसून यांचा कार्यभार सुपरवायझर यांच्यावर सोपविण्यात आला आहे.पाटणला मंडलअधिकारी असणारे बी. एस. बुधावले यांच्याकडे अतिरिक्‍त तालुका कृषीकार्यालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. तर तारळे मंडलअधिकारी म्हणून सुपरवायझर असणारे अजित ओबांसे यांचेकडे अतिरिक्‍त कार्यभार आहे. मल्हारपेठचा कार्यभार सुपरवायझर रमेश घाडगे यांचेकडे आहे. त्यामुळे दोन्ही कार्यभार संभाळत या अधिकाऱ्यांना काम करावे लागत आहे.

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची महिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमणुक करण्यात आलेले कृषीसहाय्यकांची अवस्था दयनीय आहे. एका कृषीसहाय्यकाकडे दहा ते पंधरा गावांचा कार्यभार असल्याने हे कृषीसहाय्यकही मेटाकुटीला आले आहे आहेत. अतिरिक्‍त गावांचा कार्यभार वरिष्ठ कार्यालयाकडून सतत होणाऱ्या विविध शासकीय माहिती यांची मागणी यामुळे या कृषीसहाय्यकांचा वेळ या कामांमध्ये जात आहे. तर काही कामचुकार कृषीसहाय्यक कार्यालयात न येताच घरी बसून विभागाचा आढावा वरिष्ठांना सांगतात. त्यामुळे असे कामचुकार कृषीसहाय्यक ही सध्या मोकाट आहेत.

शासनाच्या कृषीविभागाला एमआरजीएसमधून फळबाग लागवड तसेच पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्‍त शिवार तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणारी कृषी यांत्रिकीकरण अशा योजना दिल्या आहेत. मात्र पाटणच्या कृषीकार्यालयात योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नसल्याने शेतकरी वंचित राहत आहे.

आवाज कोण उठवणार?
तालुक्‍यात कृषी विभागाची दयनीय अवस्था असताना लोकप्रतिनिधींसह नेतेमंडळी एकमेकांवर टिकाटिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. आगामी विधानसभा निवडणुक कशी जिंकता येईल, या विंवचनेत असणारी ही राजकीय मंडळी याकडे लक्ष देणार का हा प्रश्‍न आहे. अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाहीत. तर योजनांसाठी आलेला निधी परत जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्‍नांवर आवाज कोण उठविणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

तालुका कृषीअधिकारी कार्यालयात तालुका कृषीअधिकाऱ्यांसह मंडल कृषीअधिकारी, सुपरवायझर, कृषीसहाय्यक यांची पदे रिक्‍त असून कार्यभार करताना अडचणी निर्माण होत आहेत. एका मंडलामध्ये 100 पेक्षा जास्त गावे असून कृषीसहाय्यकाकडे 25 ते 30 गावांचा कार्यभार असल्याने शेतकऱ्यांना योजनांची माहिती, मार्गदर्शन करणे अवघड होत आहे. अधिकारीवर्ग कमी असल्याने जलयुक्‍त शिवार, जलसंधारण आदी कामे सध्या बंद आहेत.
बी. एस. बुधावले
प्रभारी तालुका कृषी अधिकारी, पाटण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)