पाटणचे बसस्थानक दर्जेदार तयार होईल : परिवहन मंत्री दिवाकर रावते

प्रवाशांना सुविधा देण्यासाठी परिवहनमध्ये आमुलाग्र बदल

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) :

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. प्रवाशांना महामंडळाकडून मुलभूत सुविधा देण्यात येतात. प्रवाशांना वाढीव सुविधा देण्यासाठी परिवहनमध्ये आमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार पाटण बसस्थानकाची विशेष दुरुस्ती व दर्जावाढ करण्यासाठी प्रस्तावित अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा वाढीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या वाढीव निधीच्या माध्यमातून पाटणचे बसस्थानक दर्जेदार बसस्थानक म्हणून तयार होईल, असा विश्वास परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाटण बसस्थानकाच्या नुतनीकरण कामाचे भूमीपुजन आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, विभाग नियंत्रक सागर पळसुले, आगार व्यवस्थापक नितीन उतळे, रवीराज देसाई, हर्षल कदम आदी यावेळी उपस्थित होते.

पाटण हे कोकणात जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या बसस्थानकास वेगळे महत्व आहे, असे सांगून परिवहन मंत्री श्री. रावते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात एकूण 609 बसस्थानके आहेत. त्यापैकी 100 हून अधिक बसस्थानकांचे नुतनीकरण, दर्जावाढ व नव्याने बांधणी होत आहे. महाराष्ट्रातील 133 ठिकाणच्या बसस्थानक व आगाराच्या परिसराला संरक्षण भिंतीचे काम सुरु आहे.

बसस्थानकावरील प्रसाधनगृहे स्वच्छ असावीत ही प्रवाशांची अपेक्षा असते. सध्या खासगी कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडातून शंभरहून अधिक प्रसाधनगृहे नव्याने बांधण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणच्या प्रसाधनगृहांची दुरुस्तीची कामे सध्या सुरु होण्याच्या मार्गावर आहे. आहे.

महाराष्ट्रातील अनेक बसस्थानके अशी आहेत की, बांधल्यापासून डागडूजीच व रंगकामेही झालेली नाहीत. आम्ही नुकताच एक प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार 609 बसस्थानकांपैकी पहिल्या टप्प्यात 305 बसस्थानकांची किरकोळ डागडूजी व एक समान रंग काम होणार आहे, असेही परिहवन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.

सध्या लोकप्रिय झालेली शिवशाही बससेवा ही सातारा-मुंबई साठी सातारा आगारातून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. पाटण येथील आगारामध्ये 250 कर्मचारी काम करत आहे. कर्मचाऱ्यांच्या 100 कुटूंबांसाठी घर बांधणीचा प्रकल्प सुरु केला जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शेवटी दिले.

या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा आणि माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. आपल्या मनात इच्छा असली तर मार्ग आपोआप निघतो, हे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामातून दाखवून दिले आहे. त्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळात आमुलाग्र बदल केले. सर्वसामान्यांना परवडणारी अशी शिवशाही आरामदायी बसही त्यांनी सुरु केली.जनतेनेही विकास कामात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मी 2014 साली आमदार झाल्यापासून पाटण बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याला आज यश आले आहे.

पाटण तालुका दुर्गम व डोंगरी आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशाच्या गाडी चुकली तर प्रवाशाला बसस्थानकावर मुक्काम करावा लागतो. प्रवाशांच्या राहण्याची सोय येथे करावी, राज्यातील एक आदर्श बसस्थानक होण्यासाठी आणखीन निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक सागर पळसुले तर सूत्रसंचालन मंजुषा टंगसाळे यांनी यांनी केले. या कार्यक्रमास राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)