पाच वर्षात रेल्वेचा कायापालट करणार

पुणे – “भारत आणि चीनमधील रेल्वेची कायम तुलना केली जाते. चीनने चाळीस वर्षांपूवी रेल्वेसाठी केलेल्या भरीव गुंतवणुकीमुळे त्यांच्या रेल्वेचा विकास झाला. येत्या पाच वर्षामध्ये देशातील रेल्वेच्या विकासासाठी सुमारे साडे आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून रेल्वेचा संपूर्ण कायापालट करणार आहे,’ असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे सांगितले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस संस्थेच्या रौप्यमहोत्सवीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश प्रभू बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. अस्मिता चिटणीस, डॉ. दारा दमानिया आदी यावेळी उपस्थित होते.

रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, “नवीन रेल्वे मार्ग निर्मिती, जुन्या मार्गाची दुरुस्ती, विद्युतीकरण, ब्रॉडगेज लाईनचा विस्तार आदी विविध कामांच्या माध्यमातून रेल्वेमध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे साडे आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यादारे लाखो तरुणांना रोजगार मिळेल. रेल्वेचे व्यवस्थापन सर्वाधिक कठीण आहे. देशाच्या विकासाचा पाया असणाऱ्या रेल्वेमध्ये महत्वपूर्ण बदल येत्या काही वर्षात करण्यात येणार आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास घोषणा दिली, परंतु यामध्ये “सबका’ कोण आहेत, असा सवाल करतानाच डॉ. शां. ब मुजुमदार म्हणाले, देशामध्ये गरिबी, महागाई, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न आहेत. या सर्वांचे मूळ चांगले शिक्षण नसणे हेच असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सल्लागार समिती सदस्य अभय फिरोदिया, एस. के जैन, दारा दमानिया, अभिजित रानडे, किर्लोस्कर वैंपनीचे संजय किर्लोस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विपुल कुमार यांनी सूत्रसंचालन केले. समारंभानंतर ज्येष्ठ बासरीवादक रोणू मुजुमदार, सीतारवादक उस्ताद सुजात खान, अरविंद कुमार आझाद यांचा कार्यक्रम झाला.

खुल्या अर्थव्यवस्थेचे आव्हान भारत पेलेल की नाही अशी शंका असताना माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी योग्य निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा दिली. देशातील लोकांची आर्थिक विचारसरणी बदलण्याचे महत्वाचे काम त्यांनी केल्याचे गौरवाद्‌गार सुरेश प्रभू यांनी काढले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)