पाच वर्षांपासून सराटीचा बंधारा तहानलेलाच

पाण्याचा ताळमेळ जुळेना; सगळ्या बाजार गप्पा

बावडा- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिमेला पाण्याचे दुर्भिक्ष चांगलेच जाणवत आहे. नीरा नदीवरील सराटी येथील बंधारा गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेतच आहे. सरकारे जरी बदलली तरी नीरा नदीच्या पात्रात पाणी भरू शकली नाहीत. इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाची जीवनदायिनी म्हणून गणली गेलेली नीरा नदी गेल्या सहा वर्षांपासून पाण्यासाठी तहानलेली आहे. निसर्गाने जरी दुर्लक्ष केले असले तरी किमान धरणातून तरी पाणी मिळेल याच भोळ्या भाबड्या आशेवर नीरा नदीसह या भागातील शेतकरी होता. पण मनी इच्छा असेल तर सगळे काही साध्य करता येते; अन्यथा सारा दिखाऊपणाच. याचा प्रत्यय येथील शेतकऱ्यांनी घेतला. पूर्वी कॉंग्रेसचे आघाडी सरकार होते. तेव्हा ही धरणात पाणी असूनही नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत होती. तरी देखील त्या सरकारने पाणी सोडण्याची तसदी घेतली नाही. पाण्यासाठी नदीपात्रात मंत्र्यांच्या प्रतिमेसमोर शेतकऱ्यांनी महाआरती केली होती. रस्तारोको केले. पण पाण्याचा दुष्काळ हटवण्यासाठी तत्कालीन सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. आजही सरकार जरी बदलले पण लोकप्रतिनिधी आघाडी धर्माचाच आहे. मात्र, पाण्यासाठी पश्‍चिम पट्टा आसूसलेलाच आहे. गेल्या महिन्यात नीरा नदी पात्रातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. पण ते नीरा – नरसिंहपूरपर्यंत सोडण्यास लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे या पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मत आहे.

  • आश्‍वासनांचा गेला बाजार
    पाण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थ हैराण झालेले असताना पाणी “मीच देईल, माझ्याशिवाय दुसरं कुणीच देऊ शकत नाही, अशा मोठ्या वल्गना करणारे अनेकजण येऊन गेले. परंतु पाण्याचा थेंब देखील शेवटपर्यंत आलाच नाही. त्यामुळे हा सगळा गप्पांचाच बाजार आहे. तो थांबवा आणि खरंच ज्याच्यात धमक आहे. त्याने पाणी आणून दाखवावे. जनता डोळे झाकून पाणी आणणाऱ्याच्या मागे आंधळेपणाने येईल, असा सूर शेतकऱ्यांनी आळवला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)