‘पाच वर्षांनी बघू’ हा अर्विभाव चालणार नाही

राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा साविआच्या नगरसेवकांना इशारा
सातारा – पाच वर्षांनी बघू, हा ऍटिट्यूड चालणार नाही. ढिसाळ बसू नका. तुम्हाला कोणालाच समजले नाही का? लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काम करताना जबाबदारीने बोला, अशा थेट शब्दात राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांना कानपिचक्‍या दिल्या. साताऱ्यात सर्वसामान्यांची कामे होतील, याची एकमुखाने कमिटमेंट द्या अशा स्पष्ट शब्दात राजमातांनी सुनावल्याने नगरसेवकांची बोलती बंद झाली.

सातारा नगरपालिकेत सोमवारी संध्याकाळी कामकाजाची वेळ संपता संपता राजमातांच्या अध्यक्षतेखाली सातारा विकास आघाडीची झाडाझडती बैठक सव्वातास रंगली. खासदारांच्या जागी आज राजमाता कल्पना राजे यांनी नगरसेवकांना स्पष्ट शब्दात त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. नगराध्यक्षा माधवी कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभागृह नेते स्मिता घोडके उपस्थित होते.

-Ads-

राजमाता पुढे म्हणाल्या आपल शहरं आपल कुटुंब मानून काम करा. तुम्ही शहरासाठी जितकं झटाल तेवढा तुम्हाला आदर मिळेल. स्वाईन फ्लूला धन्यवाद देऊ, त्यानिमित्ताने साताऱ्याची स्वच्छता होत आहे. उगाच कोणाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचं कारण नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे. जे कार्यशून्य आहेत, त्यांना टीका करण्याची गरज पडते. चाळीस वर्षात काहींनी विकासाची खूप स्वप्नं दाखवली. मात्र, प्रत्यक्षात काही झाले नाही, असा उपरोधिक टोला राजमातांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा नाव न घेता लगावला.

राजमातांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांचीपण हजेरी घेतली. संवाद ठेवा, कामाची माहिती नगराध्यक्षांना द्या, त्यांच्याशी संवाद करण्यात कसला आलाय कमीपणा? तुम्ही प्रशासनाचे सुकाणू आहात. तुमचा काय असेल तो इगो बाजूला ठेवा. कामे न केल्यास गणपतींचे विसर्जन होते तसे लोक आपले विसर्जन करतील, असा खरमरीत इशारा राजमातांनी दिला.

बैठक संपता संपता राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी पुन्हा नगरसेवकांना लोकसहभागासाठी प्रवृत्त केले. आणि शहराच्या सौंदर्यासाठी प्रयत्नशील राहू असा आम्हाला शब्द द्या असा आग्रह धरला. पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी आम्ही सर्वजण स्वच्छ साताऱ्यासाठी कटिबध्द आहोत, असा शब्द साविआच्या वतीने राजमातांना दिला. दोन महिन्यातून एकदा नागरिक आणि नगरसेवक यांचे एक गेट-टुगेदर भरवले जाईल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे निशांत पाटील यांनी स्पष्ट केले. त्या बैठकांना मी स्वत: सुध्दा जातीने हजर राहिल, अशी ग्वाही राजमातांनी दिली.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)