पुणे: पाच वर्षांनी जलसंधारणाच्या कामाची गरज भासू नये

पुणे  – संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टॅंकरमुक्त करण्यासाठी “पाणी फाऊन्डेशन’ला मिळणारा प्रतिसाद पाहता पाच वर्षांनी जलसंधारणाच्या कामाची आवश्‍यकताच उरणार नाही, असे प्रतिपादन अभिनेता आमीर खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खान हा “सत्यमेव जयते’ या पाणी फाऊन्डेशनच्या उपक्रमाचा संचालक आहे.

“सत्यमेव जयते’ च्या पाणी फाऊन्डेशनच्या राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेचे सन 2018 हे तिसरे वर्ष असून यावर्षी राज्याच्या 24 जिल्ह्यांच्या 75 तालुक्‍यांतील चार हजार गावे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. एक मे रोजी या सर्व गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये यंदा प्रथमच पुण्यातल्या “सिम्बायोसिस’ या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी श्रमदान करणार आहेत. आमीरने सिम्बॉयोसिस शिक्षण संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत पाणी फाऊन्डेशनच्या या वर्षीच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच पाणी फाऊन्डेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ, अभिनेता गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टॅंकरमुक्त करण्यासाठी दरवर्षी चालवल्या जात असलेल्या वॉटर कप स्पर्धेला राज्याच्या ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यातून मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादाबद्दल आमीरने समाधान व्यक्त केले. “पाणी फाऊन्डेशन’ ही स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारची यंत्रणा आणि आता विद्यार्थ्यांचा श्रमदानातला प्रत्यक्ष सहभाग यामधून दुष्काळग्रस्त ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र नक्कीच बदलेल. तसेच यामुळे पुढील पाच वर्षांत जलसंधारणाच्या कामाची गरजच उरणार नाही असे आमीर म्हणाला.

विदर्भ आणि मराठवाड्यात जरी या कामाची सर्वाधिक गरज असली, तरी पुण्याच्या पूर्व भागात, इंदापूर, बारामती आणि पुरंदरमध्येही हे काम जोमाने होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण मदत करत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले. सिम्बायोसिसचे 36,000 विद्यार्थी एक मे रोजीच्या श्रमदानात सहभागी होतील, असे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले. पुण्यात दहा विद्यापीठे, 250 महाविद्यालये असून, एकूण पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांनीही या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे, असा मानस डॉ. मुजुमदार यांनी यावेळी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)