पाच महिने पुरेल एवढाच चारा

प्रत्येक महिन्याला साडेचार लाख टन चाऱ्याची गरज
नगर – पावसाने दडी मारल्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम वाया गेल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात सध्या पाणीटंचाई भासू लागली असून चाराटंचाई काही भागात जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ पाच महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यानंतर पुढील चार ते पाच महिन्यांसाठी जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान शासनाने जिल्ह्यातील 11 तालुक्‍यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्या दृष्टीने उपाययोजना देखील प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गोवंश जनावरांची (गाय, म्हैस, बैल आदी) संख्या 16 लाख 48 हजार 548 तर शेळ्या, मेंढ्यांची संख्या 11 लाख 53 हजार 836 एवढी आहे. या तब्बल 28 लाख 2 हजार 384 जनावरांसाठी प्रत्येक महिन्याला अंदाजे 4 लाख 584 मेट्रीक टन एवढा चारा लागतो. सध्याच्या परिस्थितीत 2017-18 मधील रब्बी हंगामातील शिल्लक चारा 16 लाख 86 हजार 874 मेट्रीक टन एवढा आहे. तर, खरीप हंगामानंतर 5 लाख 70 हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. हा सर्व 22 लाख 56 हजार 874 मेट्रीक टन चारा फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल. त्यानंतर मात्र पुढील चार ते पाच महिन्यांसाठी जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीमध्येही याबाबत संबंधित विभागाना निर्देश देण्यात आले आहेत.

पशुधन व महिन्याभराचा चारा
गोवंश जनावरे (गाय, म्हैस, बैल आदी)- 16 लाख 48 हजार 548. शेळ्या-मेंढ्याची संख्या – 11 लाख 53 हजार 836. प्रत्येक महिन्याला लागणारा वाळलेला चारा – 4 लाख 584 मेट्रीक टन. प्रत्येक महिन्याला लागणारा हिरवा चारा- 10 लाख 1 हजार 460 मेट्रीक टन.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अवघा 69 टक्‍के पाऊस
यंदाच्या वर्षी एक जून ते ऑक्‍टोबर याकाळात जिल्ह्यात सरासरी 69 टक्‍के पाऊस पडला आहे. यामध्ये अकोले तालुक्‍यात सरासरी 120 टक्‍के, संगमनेर 99 टक्‍के, कोपरगाव 75 टक्‍के, श्रीरामपूर 96 टक्‍के, राहुरी 57 टक्‍के, नेवासा 53 टक्‍के, राहाता 68 टक्‍के, नगर 51 टक्‍के, शेवगाव 75 टक्‍के, पाथर्डी 57 टक्‍के, पारनेर 66 टक्‍के, कर्जत 46 टक्‍के, श्रीगोंदा 53 टक्‍के तर जामखेड तालुक्‍यात सरासरी 65 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी या काळात तब्बल 156 टक्‍के पावसाची नोंद झाली होती.

जनावरांसाठी स्वतंत्र टॅंकर
जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या जलसंधारण समितीच्या बैठकीत मनुष्याला दररोज 20 लिटर पाणी लागते. त्यानुसार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश नाही. परिणामी जनावरांना पाणी उपलब्ध करणे अडचणीचे ठरले. त्यामुळे शासनाने मनुष्याप्रमाणे जनावरांसाठी देखील स्वतंत्र टॅंकर चालू करावेत अशी मागणी सदस्य सुनील गडाख यांनी केली. त्याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेने शासनाला पाठविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)