पाच दिवसांच्या बाप्पांचे भर पावसात विसर्जन

 

पिंपरी – सुंदर आरास, विद्युत रोषणाई, प्रसन्न वातावरण आणि गोड-धोड नैवद्यासोबत चैतन्यमयी पाच दिवस पूर्ण झाले आणि भाविकांनी मोठ्या भावुक अंत:करणाने पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला. मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला भाविक भक्तांनी गणपती बाप्पांकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्‍वासन घेऊन सजल बाप्पांच्या मूर्तीस विसर्जित केले. मंगळवारी सकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस सुरू झाला होता. दिवसभर थांबून थांबून पावसांच्या सरी कोसळतच होत्या. अशा भावनांनी आणि पावसांनी चिंब झालेल्या वातावरणात सजल नेत्रांनी गणरायांच्या भक्‍तांनी आपल्या आराध्यास विसर्जन घाटावर नेले.

काही गणेशभक्‍तांच्या घरी पाच दिवस बाप्पा विराजित असतात, पाचव्या दिवशी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. अशा गणेशभक्‍तांसाठी पिंपरी-चिंचवडच्या 26 घाटांवर पालिका प्रशासनाच्या वतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशचतुर्थीपासून सुरू झालेली पावसाची सतंतधार सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. यामुळे बाप्पांच्या डोक्‍यावर आज भक्‍तांनी छत्री धरुन त्यांना निरोप देण्यासाठी आणले. बाप्पांच्या मूर्तींसमोर बच्चे कंपनी जोरदार जयघोष करत होती परंतु त्यांच्या मनात बाप्पा जाणार असल्याचे दु:ख ही होते.

पाऊस आज जणू काही गणेशाच्या लाडक्‍या भक्‍तांची परीक्षाच घेत होता. सातत्याने कोसळत असलेल्या सरींमुळे भाविकांना घाटावर बाप्पांची आरती करणे देखील अवघड होत होते. तरीदेखील वेगवेगळे प्रयत्न करून भक्‍तांनी बाप्पांची आरतीही केली आणि मोरया मोरयाच्या जयघोष विसर्जन घाट आणि हौद दुमदुमून टाकले होते. पावसामुळे भाविकांची तारांबळ होत होती मात्र तरीही पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भाविक अगदी विधीवत गणरायाचे विसजर्न करत आहेत. विसजर्नासाठी पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, मोशी अशा 26 घाटांवर हे विसर्जन करण्यात आले असून नदी पात्रात पाण्याचा प्रवाह व पाणी पातळी पाहता सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना खोल पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच गणपती मूर्तीचे विसर्जन हे विसजर्न हौदातच करा व सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करा असे आवहनही महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कधी उत्साह कधी उदासी…
गेल्या पाच दिवसांपासून बाप्पांना विसर्जन घाटावर नेईपर्यंत आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. परंतु, विसर्जन करुन परतणारे चेहरे खूपच उदास आणि खूप काही तरी हरिवल्यासारखे वाटत होते. विशेषत लहान मुलांचे चेहरे आणि न लपविता येणारे त्यांचे अश्रू बाप्पाविषयीचे त्यांचे प्रेम जाहीर करत होते. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेली आरास, तो सुंदर मखर, झगमगणारी लाइटिंग आज ही सर्व काही तसेच होते परंतु बाप्पांसोबत जणू काही चैतन्यच गेल्याप्रमाणे उदास भासत होते. मुलांना आणि स्वत:ला समजावत की बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहेत तेव्हा आणखी उत्साहाने आणि आनंदाने हा सोहळा परत साजरा करू. आणखी सुंदर आरास करू असे सांगत मनोभावे भक्‍तांनी बाप्पांना निरोप दिला.

दुथडी भरुन वाहणारी नदी...
बऱ्याचवर्षी विसर्जनासाठी प्रशासनाला धरणातून पाणी सोडावे लागायचे परंतु यंदा बाप्पांच्या आगमनाने वरुणदेव ही अत्यंत प्रसन्न झाले आहेत. पहिल्या दिवसापासून सुरू झालेला वर्षाव सातत्याने सुरूच आहे. त्यामुळे नदीही दुथडी भरुन वाहत आहे तसेच धरणही पूर्ण भरले असल्याने पाणी सोडणे भागच आहे. त्यामुळे यावर्षी नदी चांगलीच दुथडी भरुन वाहत आहे. पाण्याचा प्रवाहही खूप वेगवान असल्याने मूर्ती जास्त अडकत नाहीत किंवा नदीपात्राच्या मध्यभागी जाण्याचीही जास्त गरज भासत नाही. पाण्याची पातळी वाढल्याने काठावरुनही यंदा विसर्जन शक्‍य होत असल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)