पाचशें किलोमीटरचे रस्ते झाले गायब ! 

 – शहरात फक्‍त 1,400 किलोमीटरचे रस्ते


– रस्त्यांच्या मोजणीतील धक्कादायक वास्तव


 

पुणे :  महापालिकेच्या स्थापनेपासून विकसित करण्यात आलेले तसेच वेळोवेळी हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झालेले पालिकेचे तब्बल 500 किलोमीटरचे रस्ते गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हे रस्ते नेमके गेले कोठे? असा प्रश्‍न आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित केलेल्या पालिकेच्या “ओपन डाटा पोर्टल’वर शहरातील सध्याच्या रस्त्यांची लांबी 2017 मध्ये 1,985 किलोमीटर आहे. ही माहिती केंद्र व राज्यशासनालाही देण्यात आली आहे. तर स्मार्ट सिटीकडून अत्याधुनिक वाहनांद्वारे शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केल्यानंतर शहरात अवघे 1,398 किलोमीटरचे रस्ते असल्याचे वास्तव समोर आले आहे.

स्मार्ट सिटीकडून गेल्या वर्षभरात “रोड ऍसेसमेंट मॅनेजमेंट सिस्टीम’ अंतर्गत सर्व रस्त्यांची अत्याधुनिक वाहनाद्वारे तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी जीपीएस, अत्याधुनिक कॅमेरे, तसेच थ्री-डी मॅपिंग करून रस्त्यांचे मोजमाप घेण्यात आले आहे. या मोजणीत शहरात एकूण 1,398 किलोमीटरचे रस्ते आढळून आले असून त्यात 12 मीटरखालील 970 कि.मी., 12 ते 24 मीटरचे 314 कि.मी., 24 ते 30 मीटरचे 60 कि.मी., 30 ते 36 मीटरचे 29 कि.मी. तर 36 ते 61 मीटरचे 23 कि.मी. रस्ते आहेत.

 

प्रशासनाकडे उत्तरच नाही
विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले नवीन रस्ते दरवर्षी विकसित केले जातात. 2017 मध्ये महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत डांबरी रस्ते, पदपथ, सिमेंटचे रस्ते यांची एकत्रित माहिती पालिकेच्या संकतेस्थळावर जाहीर केली. याचे केंद्राकडून विशेष कौतुकही करण्यात आले. पालिकेच्या 2017 पर्यंतच्या उपलब्ध रेकॉर्डनुसारच ही माहिती संकलित करून देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्षात हे रस्ते पालिकेने विकसित केले असून त्याची नोंदही आहे. मात्र, आता स्मार्ट सिटीने केलेल्या तपासणीत अवघे 1,398 किलोमीटरचे रस्ते अस्तित्वात असल्याचे समोर आल्याने महापालिकेने कोणत्या आधारावर ही माहिती जाहीर केली? तसेच जर हे रस्ते रेकॉर्डवर आहेत, त्यांच्या विकसनासाठी खर्च झाला आहे, तर मग ते का आढळून आले नाहीत? याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही.
——————

स्मार्ट सिटीकडून गेल्या वर्षभरात रोड ऍसेसमेंट मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत शहरातील सर्व रस्त्यांची अत्याधुनिक वाहनाद्वारे तपासणी करण्यात आली होती. त्यात सुमारे 1,400 किलोमीटरचे रस्ते शहरात असल्याचे समोर आले आहे. मात्र, महापालिकेकडून संकेतस्थळावर कोणत्या आधारे माहिती दिली ही माहिती घेतली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात आता तरी नवीन नोंदीनुसार इतकेच रस्ते आहेत.
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, मनपा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)