पाचवा कसोटी क्रिकेट सामना: पहिल्या सत्रावर इंग्लंडचे वर्चस्व

लंडन: अखेरचा सामना खेळणाऱ्या ऍलिस्टर कूकची नाबाद खेळी आणि कीटन जेनिंग्जच्या साथीत त्याने दिलेल्या अर्धशतकी सलामीमुळे येथे सुरू झालेल्या भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत पहिल्या डावांत एक बाद 68 धावांची मजल मारता आली. उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा कूक 4 चौकारांसह नाबाद 37 धावांवर खेळत असून पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्यात आलेला मोईन अली नाबाद 2 धावांवर त्याला साथ देत आहे.

कूक आणि जेनिंग्ज यांनी अत्यंत सावध खेळ करताना इंग्लंडला 23.1 षटकांत 60 धावांची सलामी दिली. यात जेनिंग्जचा वाटा 75 चेंडूंत 2 चौकारांसह केलेल्या 23 धावांचा होता. वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरल्यानंतर रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कूक व मोईन जोडीने उपाहारापर्यंत लढत दिली.

तत्पूर्वी अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना वगळून भारताने या कसोटीसाठी फलंदाज हनुमा विहारी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश केला. विराट कोहलीने अखेर अश्‍विनच्या दुखापतीची कबुली दिली. दुखापतग्रस्त असतानाही अश्‍विनला खेळवल्याचेही त्याने मान्य केले.

तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्‍विनच्या मांडीतील स्नायू दुखावला होता. त्यानंतर चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला अश्‍विनची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनुसार अश्‍विनला पाच दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला असूनही त्याला चौथ्या कसोटी सामन्यात खेळवण्यात आले होते. परिणामी अश्‍विन आणि भारतीय संघाचीही कामगिरी ढेपाळली. दुखापतग्रस्त असूनही खेळवल्यामुळे अश्‍विनची दुखापत अधिक चिघळल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याआधी मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून इंग्लंडने आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने तिसरी कसोटी जिंकून पुनरागमनाची चिन्हे दाखविली होती. परंतु इंग्लंडने चौथा कसोटी सामना जिंकताना मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. विराट कोहलीचा सन्माननीय अपवाद आणि एखाददुसऱ्या डावांत त्याला अजिंक्‍य रहाणे व चेतेश्‍वर पुजाराची मिळालेली साथ वगळता भारतीय फलंदाज या मालिकेत अपयशीच ठरले. सलामीवीरांचे अपयश भारताला सर्वात तोट्याचे ठरले. परंतु भारतीय गोलंदाजांनी हा दौऱ्या खऱ्या अर्थाने गाजविला.

ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव व हार्दिक पांड्या या गोलंदाजांनी आपले कौशल्य पणाला लावून भारताच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शर्माने अनेक विक्रमही मोडले. विक्रमांच्या बाबतीत बुमराह व पांड्याही मागे नाहीत. पण फलंदाजांच्या अपयशामुळे संघ पराभूत झाला आणि गोलंदाजांची कामगिरी झाकोळली. मालिकेतील चार सामने झाले असून त्यात सहावेळा भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी धाडला. भारतीय गोलंदाजांना 1986 नंतर प्रथमच अशी कामगिरी करता आली आहे. त्यात हुकमी गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघात नसताना ही कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल.

संक्षिप्त धावफलक-
इंग्लंड- पहिला डाव- (ऍलिस्टर कूक नाबाद 37, कीटन जेनिंग्ज 23, मोई’ अली नाबाद 2, रवींद्र जडेजा 15-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)