इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. कारण नवाझ शरीफ  यांच्याविरोधात पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने  ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार नाहीत.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 नुसार दोषी ठरविण्यात आलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पार्टीचे प्रमुख पद स्वीकारु शकत नाही. यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीच्या अध्यक्ष पदावरुन पाय उतार झाले होते. डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला आहे. मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी निर्णयाआधी सांगितले की, जनतेला चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांची गरज आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. तसेच शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनाही अपात्र ठरवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)