पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत मारा

श्रीनगर – पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीत मारा केला. त्यांनी जम्मू-काश्‍मीरच्या उरी क्षेत्रातील निवासी भागाला लक्ष्य केले. ही घटना नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. सुदैवाने, पाकिस्तानी माऱ्यात भारतीय बाजूची कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, पाकिस्तानी सैनिकांनी डागलेल्या तोफगोळ्याच्या स्फोटात एका घराच्या लगत असणाऱ्या स्वच्छतागृहाचे नुकसान झाले. पाकिस्तानात सत्ताबदल होऊन माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशीच पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाची आगळीक केली.

पाकिस्तानी सैनिक सातत्याने कुरापती काढून भारतीय हद्दीत मारा करतात. त्या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सशस्त्र दलांनी अवलंबले आहे. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊनही त्या देशाला शहाणपण सुचत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)