पाकिस्तानात विरोधकांच्या निशाण्यावर इम्रान खान

भारताला चर्चेचा प्रस्ताव दिल्यावरून टीकेची झोड
इस्लामाबाद – भारताला चर्चेचा प्रस्ताव दिल्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वदेशातील विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. पाकिस्तानी संसदेला विश्‍वासात न घेता ती कृती केल्यावरून विरोधकांनी इम्रान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

इम्रान यांनी 14 सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव भारताने स्वीकारला. तशात पाकिस्तानी सैनिकांनी एका भारतीय जवानाची गळा चिरून निर्घूण हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे भारताने चर्चा रद्द केल्याने पाकिस्तानवर नाचक्कीची वेळ आली. यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटची सोमवारी सायंकाळी बैठक झाली. त्या बैठकीत विरोधकांनी इम्रान यांना टीकेचे लक्ष्य केले.
इम्रान यांनी पत्रात काश्‍मीरबरोबरच दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरही चर्चेची तयारी दर्शवली. दहशतवादावर चर्चेची तयारी दर्शवल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काश्‍मीरमधील स्थिती पाहता चर्चेचा प्रस्ताव अनाकलनीय आहे. इम्रान दूरदृष्टीचा अभाव असलेले निर्णय घाईघाईने घेत आहेत. केवळ एक व्यक्ती भारताला चर्चेचा प्रस्ताव कसा काय देऊ शकते, असा सवाल विरोधकांनी केला. विरोधकांच्या टीकेनंतर पाकिस्तानच्या माहिती खात्याचे मंत्री फवाद चौधरी यांनी सरकारची भूमिका मांडली. भारताबरोबरच्या वादांवर तोडगा काढण्याची सरकारची इच्छा आहे. दोन्ही देश 70 वर्षांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. भारताची इच्छा असल्यास आणखी 70 वर्षे आम्ही संघर्ष करू शकतो. जर आण्विक युद्ध झाले; तर उपखंडात विध्वंस घडेल, असा इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)