उमेदवारासह 14 ठार 65 जखमी
पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानात एका निवडणूक प्रचार रॅलीत आत्मघातकी बॉंबस्फोट करण्यात आला आहे. पेशावर येथे अवामी नॅशनल पार्टीच्या प्रचार रॅलीत करण्यात आलेल्या या आत्मघातकी हल्ल्यात अवामी नॅशनल पार्टीचे उमेदवार हारून बिल्लौर मारले गेले आहेत. त्यांच्याबरोबर पक्षाच्या आणखी दोन नेत्यांसह एकूण 14 जण ठार झाले असून 65 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.
हारून बिल्लौर हे निवडणूक रॅलीसमोर भाषण करण्याच्या तयारीत असतानाच आत्मघातकी हल्लेखोराने स्व:ला उडवून दिले. हा बॉंबस्फोट इतका जबरदस्त होता, की मारल्या गेलेल्या 14 जणांच्या देहांचे तुकडे तुकडे झाले. या भीषण स्फोटात अन्य 65 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
हारून बिल्लौर यांचे वडील बशीर बिल्लौर देखील अवामी नॅशनल पार्टीचे नेते होते. आणि त्यांचीही अशाच प्रकारे आत्मघाती हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. 22 डिसेंबर 2012 रोजी पेशावर येथेच आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
निवडणुकांदरम्यात नेत्यांवर हल्ले होण्याची शक्यता असल्याची जाहीर सूचना कालच देण्यात आली होती. तहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते इमरान खान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानात 25 जुलै रोजी मतदान होणार आहे. हारून बिल्लौर यांच्या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा