पाकिस्तानातही तिहेरी तलाक अमान्य ; आपल्या देशातच का नाही ?

पुणे- तिहेरी तलाकचा विषय हा केवळ महिलांचा नाही, तर तो मानवाधिकाराचा विषय आहे. ही मानवधिकाराची लढाई आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या हक्‍कापासून वंचित ठेवणे हे समाजासाठी घातक आहे. तिहेरी तलाक हा संविधानाच्याच नव्हे, तर कुराणच्याही विरोधात आहे, असे मत माजी खासदार आरीफ मोहंमद खान यांनी व्यक्त केले. पाकिस्तान सारख्या देशात तिहेरी तलाकला मान्यता नसताना आपल्या देशातच का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ऍड. बालाजी श्रीनिवासन, मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सहसंस्थापक नुरजहॉं साफिया नियाज उपस्थित होते. यावेळी श्रीनिवासन यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार तर नूरजहॉं यांना समाज प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

खान म्हणाले, तिहेरी तलाक कायदा अजून शक्तिशाली व्हायला हवा. तिहेरी तलाकमध्ये तीन वर्षांची शिक्षा असायलाच हवी. लोकसभेत बिल पास झाले असताना राज्यसभेत कायदा पास होवून नये यासाठी विरोधी पक्ष मुख्यत: कॉंग्रेस पक्ष सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबाव टाकत आहे.

नूरजहॉं म्हणाल्या, इतर धर्मांतील जे महिलांना हक्‍क आहेत तेच हक्‍क आम्हाला सुद्धा मिळायला हवे, यासाठी 2011 साली आम्ही कामाला सुरुवात केली. यासंदर्भात 5 हजार महिलांचा सर्वे घेण्यात आला. यात 90 टक्‍यांपेक्षा जास्त महिलांनी तिहेरी तलाकला विरोध दर्शविला आहे. तिहेरी तलाक बरोबरच हलाल, बहूपत्नीत्व सुद्धा या कायद्यात यायला हवेत. लवकरात लवकर मुस्लिम कोड बिल यायला हवं.

शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, मुस्लिम धर्मात सुधारणेबाबत बोलले की भाजपकडे झुकल्याचा आरोप नेहमी होतो. हे चुकीचे आहे. संविधानात ज्या प्रमाणे सर्वांना हक्‍क देण्यात आले तेच हक्‍क आम्हाला हवे. शरियत मुस्लिम धर्मात, मुस्लिम देशात कुठे ट्रिपल तलाक नसताना सेक्‍युलर भारतातच का असा सवाल तांबोळी यांनी केला.

हमीद दलवाई यांचे विचार आजही लागू आहेत. अभिनेते बऱ्याचदा दुसऱ्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात त्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी खूप कमी मिळते. मी हमीद दलवाई यांच्या मुस्लिम धर्म सुधारणेच्या विचारांशी सहमत असून त्याचे विचार आजही समाजासाठी लागू आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)