पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याची अमेरिकेची तयारी; पण सशर्त

दहशतवादी गटांविरोधात आणखी पाऊले उचलण्याची अट

वॉशिंग्टन -मागील काही काळापासून पाकिस्तानला झुलवल्यानंतर त्या देशाला आर्थिक मदत देण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. मात्र, ही मदत सशर्त असेल. मदत हवी असल्यास दहशतवादी गटांविरोधात आणखी पाऊले उचला, असा स्पष्ट संदेश अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान पुरवले जात असल्याबद्दल काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा दिला. दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याबद्दल बरेच काही गमावावे लागेल, असे ट्रम्प यांनी पाकिस्तानला उद्देशून म्हटले होते. त्यामुळे अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे अधोरेखित झाले. ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यापाठोपाठ

पाकिस्तानला अटीचे पालन केले तरच आर्थिक मदत देण्याची तयारी अमेरिकेने दर्शवल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रम्प प्रशासनाने बुधवारी अमेरिकी संसदेपुढे यासंदर्भातील भूमिका मांडली. पाकिस्तानला लष्करी मदत म्हणून 25 कोटी 50 लाख डॉलर्स उपलब्ध केले जातील. मात्र, शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले घडवणाऱ्या गटांना लगाम घालण्यास आणखी पाऊले उचलली तरच पाकिस्तानला ही मदत वापरता येऊ शकेल, असे ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अफगाणिस्तानात तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांवर पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांकडून हल्ले घडवले जातात. अशाप्रकारचे हल्ले अमेरिकेच्या चिंतेची प्रमुख बाब आहे.

सध्या अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेलेले आहेत. अशातच अमेरिकेने सशर्त आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवून पाकिस्तानच्या जखमवेर आणखीच मीठ चोळल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीने अलीकडेच एक ठराव मंजूर केला. याशिवाय, अमेरिकेबरोबरच्या तीन उच्चस्तरीय बैठका पाकिस्तानने रद्द केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)