पाकिस्तानमधील 26/11 खटल्याची सुनावणी रडतखडतच

8 वर्षांत बदलले 9 न्यायाधीश
लाहोर –मुंबईत 2008 मध्ये झालेल्या महाभयंकर दहशतवादी हल्ल्याशी (26/11) संबंधित खटल्याची सुनावणी पाकिस्तानमधील विशेष न्यायालयात रडतखडतच सुरू आहे. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी 8 वर्षांत तब्बल 9 न्यायाधीश बदलले आहेत. त्यामुळे खटला निकाली काढण्याविषयी पाकिस्तान बिल्कूल गंभीर नसल्याच्या बाबीवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने मुंबईतील हल्ला घडवला. या हल्ल्यामागे असणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर प्रचंड दबाव टाकला. अखेर या दबावापुढे झुकून पाकिस्तानने 2009 मध्ये स्वतंत्रपणे खटला सुरू केला. तोयबाचा म्होरक्‍या झकिऊर रेहमान लखवी याच्यासह सात जणांना आरोपी करण्यात आले. मात्र, या खटल्याचे कामकाज अतिशय संथगतीने आणि दिखाव्यापुरतेच सुरू आहे. मुंबई हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लखवी यालाही डिसेंबर 2014 मध्येच जामीनावर सोडण्यात आले. काही दिवसांपासून पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला नजरकैदेत ठेवले आहे. त्याच्या विरोधातही खटला चालवला जावा आणि हल्लाप्रकरणी फेरतपास करावा, अशी आग्रही मागणी नुकतीच भारताने केली. मात्र, नेहमीप्रमाणेच ही मागणी फेटाळताना पाकिस्तानने खटल्याचे कामकाज बरेच पुढे गेल्याची बतावणी केली.
अशातच पाकिस्तानमधील या खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश पुन्हा बदलले आहेत. न्यायाधीश सोहेल अक्रम यांच्यापुढे सुमारे दोन वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यांची नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्याआधी या खटल्याचे कामकाज पाहणारे न्यायाधीश कौसर अब्बास झैदी यांच्याकडे पुन्हा ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या घडामोडी पाहता पाकिस्तानमधील खटला लवकर निकाली निघण्याची सूतराम शक्‍यता वाटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)