पाकिस्तानने थांबवली अमेरिकेशी चर्चेची प्रक्रिया

ट्रम्प यांनी केलेल्या विधानांवरील निषेधाची कृती

इस्लामाबाद – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच एका जाहीर भाषणात पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करून त्याबद्दल त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आता पाकिस्तानने अमेरिकेशी कसल्याही प्रकारची चर्चा करायची नाही असा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

विदेश मंत्री ख्वाजा असिफ यांनी काल सिनेट मध्ये ही माहिती दिली. सिनेटची ही समिती सध्या अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांचा आढावा घेत आहे. असिफ यांनी या समितीला सांगितले की अमेरिकेचा निषेध करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून अमेरिकेला पाकिस्तानी प्रतिनिधीही पाठवणे आता थांबवण्यात आले आहे. हे वृत्त तेथील डॉन या राष्ट्रीय वृत्तपत्राने दिले आहे. अमेरिकेचे मध्य अशिया विभागाचे सेक्रेटरी ऍलिस वेल्स हे आज पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणे अपेक्षित होते व पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असिफ हे मागच्याच आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणे अपेक्षित होते. पण हे दोन्ही दौरे या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाण प्रश्‍नात भारताने अधिक लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यालाही पाकिस्तानचा जोरदार विरोध आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानला अस्थिर करण्याची कृती भारताकडून केली जाऊ शकते असा पाकिस्तानचा आक्षेप आहे. आणि तो अमेरिकेला कळवण्यातही आला होता परंतु तरीही ट्रम्प यांनी जाहीरपणे भारताला अफगाण प्रश्‍नात लक्ष घालण्याची सुचना केल्याने पाकिस्तानच तीळपापड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)