पाकिस्तानच्या एका बंदुकीच्या गोळीच्या बदल्यात भारताकडून 10 गोळ्या

जम्मू-काश्‍मीरच्या उपमुख्यमंत्र्यांची परखड प्रतिक्रिया

जम्मू,  -पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधी भंगासंदर्भात आज जम्मू-काश्‍मीरचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते निर्मल सिंह यांनी अतिशय परखड प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या बंदुकीच्या एका गोळीच्या माऱ्याला भारतीय लष्कर 10 गोळ्यांनी प्रत्युत्तर देत आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानी सैनिकांनी आज शस्त्रसंधीचा भंग करून केलेल्या माऱ्यात एक भारतीय महिला मृत्युमुखी पडली. त्यावर सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानच्या आगळिकीला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत भारतीय लष्कर उत्तर देत आहे. सीमेलगत पाकिस्तान आमच्या नागरिकांची निर्घूण हत्या करत आहे. ते कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही. त्या कृत्यांचा मुकाबला आम्ही लष्करी आणि राजनैतिक पद्धतीने कठोरपणे करू, असा इशारा त्यांनी दिला.

शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेवणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच नागरी भागांनाही लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानी माऱ्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यानंतरही पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळिकी थांबलेल्या नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)