इस्लामाबाद: पाकिस्तानातील कर्जबाजारी अर्थव्यवस्थेची सुधारणा करण्यासाठी काही विदेशी अर्थतज्ञांची मदत पंतप्रधान इम्रान खान घेणार आहेत. नव्याने स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार पॅनेलमध्ये काही विदेशी अर्थतज्ञांचा समावेश करण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे. सुमारे 10 अब्ज डॉलरची तूट भरून काढण्यासाठी इम्रान यांना तातडीने काही महत्वाच्या धोरणांवर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
पाकिस्तानात सध्या 18 अब्ज डॉलरची तूट आहे. तर तेथील विदेशी गंगाजळी केवळ 10 अब्ज डॉलर इतकी कमी आहे. याच्या आधारे केवळ दोन महिन्यांची विदेशी आयात केली जाऊ शकणार आहे. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेणे किंवा चीनला आर्थिक मदतीची याचना करणे एवढे दोनच मार्ग पाकिस्तानपुढे शिल्लक राहतात. त्यासाठीच हे नवीन आर्थिक सल्लागारांचे पॅनेल नवीन सरकारला सहाय्य करणार आहे.
या नवीन सल्लागार समितीची बैठक लवकरच बोलावली जाणार आहे. यापूर्वीच्या आर्थिक सल्लागार समितीच्या बैठकीसमोर कोणतेही ठोस उद्दिष्टच नव्हते. नवीन समितीमध्ये एकूण 18 सदस्य असणार आहेत. त्यातील 11 हे पाकिस्तान सरकारचे तर 8 सदस्य खासगी क्षेत्रातील असणार आहेत. या खासगी क्षेत्रातील तज्ञांमध्ये प्रिन्स्टन विद्यापिठाचे अर्थतज्ञ आतिफ मिलान, हॉवर्ड केनेडी स्कूलचे आसिफ इजाम ख्वाजा आणि लंडनच्या इकोनॉमिक स्कूलचे प्राध्यापक इम्रान रसूल यांचा समावेश आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी या आर्थिक सल्लागार परिषदेकडून 2 आठवड्यात शिफारसींची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)