इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेतून लंडनस्थित अर्थतज्ञ इम्रान रसूल हे बाहेर पडले आहेत. या परिषदेमध्ये असलेले अमेरिकास्थित शिक्षणतज्ञ आतिफ आर मिलान यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळेच रसूल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आतिफ आर.मिलान हे अहमदी असल्याने या परिषदेतील त्यांच्या सहभागावर कट्टरवाद्यांकडून टीका व्हायला लागली होती. त्या दबावामुळे पाकिस्तान सरकारने शुक्रवारी मिलान यांचे या परिषदेतील नामनिर्देशन मागे घेतले होते, असे प्रसिद्धी माध्यमांमधील वृत्तामध्ये म्हटले आहे.

आपल्यालाला अत्यंत दुःखाने आर्थिक सल्लागार परिषदेचा राजीनामा द्यावा लागत आहे, असे रसूल यांनी शनिवारी सकाळी ट्विटरवर म्हटले. रसूल हे लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. मिलान यांच्यासारख्या शिक्षणतज्ञाची पाकिस्तानच्या या परिषदेला आवश्‍यकता होती. मिलान यांना ज्या पद्धतीने परिषदेचा राजीनामा देण्यास सांगितले गेले, त्याच्याशी आपण असहमत असल्याचेही रसूल यांनी म्हटले आहे. आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये भेदभाव विरहीत, पुराव्याच्या आधारे सल्ला देणाऱ्यांची आवश्‍यकता आहे.

पाकिस्तानच्या भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. एकापाठोपाठ दोन विदेशी अर्थतज्ञांनी आर्थिक सल्लागार परिषदेचा राजीनामा दिल्याने पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)