पाकिस्तानचे शेपूट वाकडेच (अग्रलेख)

“सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तान योग्य धडा घेईल असे वाटत होते. पण “पाकी कुत्र्याचे शेपूट कोणत्याही नळीत घातले तरी वाकडेच राहणार’ असल्याचे संकेत मिळत असल्याने भारतालाही आता तयार रहावे लागणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांच्या अमानुष हत्त्येचा बदला घेण्यासाठी भारताने काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध सीमापार जोरदार कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह दिले असले तरी ते पुरेसे नाही. 
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या महासभेत दहशतवादाच्या मुद्यावरुन फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे आणि “भारताने काही दु:साहस केल्यास अणुबॉंबचा वापर करण्याचा’ इशाराही दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सत्ताबदल झाला असला तरीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शांततेसाठी चर्चा करण्याऐवजी भारत राजकारणाला पसंती देत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मारल्या आहेत. काश्‍मीरचा मुद्दादेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला असल्याने “पाकिस्तानला भारताबरोबर शांततेचे संबंध नकोच आहेत,’ हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये स्वराज यांनी अपेक्षेप्रमाणे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर सडकून टीका केली. “पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळवले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उजळ माथ्याने हिंडत आहे’, असा शब्दांत स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारले आणि “पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी जागतिक सहकार्या’ची अपेक्षाही व्यक्‍त केली. या भाषणाला उत्तर देताना पाकिस्तानने थोडाफार तरी विवेक दाखवावा, अशी अपेक्षा होती. पण अणुबॉंबच्या वापराची धमकी देऊन शाह महमूद कुरेशी यांनी आपला बालिशपणा दाखवून दिला आहे.
आयएसआय आणि दहशतवादी संघटनांच्या हातचे बाहुले बनलेल्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना भारतावर विखारी टीका करावीच लागते. अशा वेळी जागतिक शांततेसाठी स्थापन झालेल्या “युएन’च्या व्यासपीठावर बोलताना “भारतावर अणुबॉंब टाकण्याची धमकी’ देतानाही त्यांना काहीही वाटत नाही. “पाकिस्तानी करवायांमुळेच भारताला चर्चेचा मार्ग स्वीकारता येत नाही’, असा आरोप करूनही पाकिस्तानने उत्तर दिले नाही. त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. प्रत्येक वेळी पाकिस्तानमुळेच शांततेसाठीची चर्चा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतासमोर
चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही या चर्चेला तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करून एकाची हत्या केली. यामुळे, चर्चेसाठी भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. पण त्यालाही पाकिस्तानकडे उत्तर नव्हते. पाकिस्तान भारतासमवेत सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास इच्छुक होता.
“शांतता आणि दहशतवाद एकाचवेळी नांदू शकत नाहीत,’ ही गोष्ट पाकिस्तानने समजून घेण्याची गरज आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी भारताने आजवर अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात “लाहोरची बसयात्रा’ केली होती. पण त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी केलेल्या सहकार्याच्या कराराची शाई वाळण्याच्या आत पाकिस्तानने कारगिल येथे घुसखोरी केली आणि भारतावर युद्ध लादले होते. आताही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. कारण पाकिस्तानात जरी सत्ताबदल झाला असला तरी भारताबाबतच्या धोरणात बदल झालेला नाही. इमरान खान यांच्या हातात सध्या पाकिस्तानची सत्ता असली, तरी ते “लष्कराचे एक बाहुले’ म्हणूनच काम करीत आहेत, हे दिसून येत आहे. खरे तर गेल्यावेळी इमरान खान यांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला होता.
मात्र यावेळी अगदी सुरुवातीपासून ते यश मिळवतील, असे वातावरण तयार करण्यात आले होते. इमरान खान यांचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी यावेळेस “लाडला’ असा केला होता. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयचा वरदहस्त लाभलेल्याचा उल्लेख पाकिस्तानी माध्यमांमध्ये अशा प्रकारे “लाडला’ असा केला जातो. इमरान यांनी त्यांच्या उदारमतवादी इस्लामच्या धोरणात बदल करून कट्टरवादाकडे प्रवास सुरू केला होता; म्हणूनच लष्कराने त्यांना पाठिंबा दिला होता. गेल्या काही वर्षांमध्ये लष्कराबरोबरच विविध दहशतवादी संघटनांसोबत आणि त्यांच्या नेत्यांसोबत असलेली इमरान यांची जवळीकही वाढली होती. पाकिस्तानात केवळ “लष्कराला जे हवे तेच घडते,’ हा आजवरचा इतिहास आहे. मूलतत्त्ववादाच्या दिशेने सुरू झालेला इमरान खान यांचा प्रवास हा भारतासाठी अडचणीचाच असणार होताच. त्याप्रमाणेच सर्व काही घडत आहे. निवडणुका जिंकल्यानंतर इमरान खान म्हणाले होते की, “भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकले तर मी दोन पावले पुढे टाकेन.
‘ पण याच सरकारचा एक मंत्री जर भारतावर अणुबॉंब टाकण्याची भाषा करीत असेल तर परिस्थिती सुधारणार तर कशी? पाकिस्तानातील ही नवी राजवट म्हणजे कठपुतळीचा प्रयोगच ठरत आहे. त्यामुळे भारताला आता आपल्याही धोरणात बदल करण्याची गरज आहे.पाकिस्तानबरोबर चर्चा न करणे हा एक भाग असला तरी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत धडा शिकवण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे. “सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तान योग्य धडा घेईल असे वाटत होते. पण “पाकी कुत्र्याचे शेपूट कोणत्याही नळीत घातले तरी वाकडेच राहणार’ असल्याचे संकेत मिळत असल्याने भारतालाही आता तयार रहावे लागणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांच्या अमानुष हत्त्येचा बदला घेण्यासाठी भारताने काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध सीमापार जोरदार कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह दिले असले तरी ते पुरेसे नाही. जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी अधिक मुत्सद्दीपणा दाखवण्याची गरज आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)