पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल जाधवप्रकरणी मांडणार बाजू

फटफजितीनंतर बदलला वकील
इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानची बाजू त्या देशाचे ऍटर्नी जनरल अश्‍तर औसफ अली मांडणार आहे. फटफजितीनंतर पाकिस्तानने आता याप्रकरणी वकील बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. त्यामुळे पाकिस्तानला जबरदस्त हादरा बसला. एवढेच नव्हे तर, जाधव प्रकरणाच्या हाताळणीवरून पाकिस्तानी परराष्ट्र खाते स्वत:च्याच देशात चौफेर टीकेचे धनी ठरले. पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी ब्रिटनस्थित वकील खावर कुरेशी यांची निवडही टवाळीचा विषय बनला आहे. अशातच कुरेशी यांना तब्बल 50 हजार पौंड फी देण्यात आली. तर भारताची बाजू यशस्वीपणे मांडणारे वरिष्ठ वकील हरीष साळवे यांनी केवळ 1 रूपया घेतला, या वृत्ताने पाकिस्तानच्या ठसठसत्या जखमेवर आणखीच मीठ चोळले गेले. यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकिलांचे नवे पथक नेमण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ही जबाबदारी अली यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणाऱ्या 46 वर्षीय जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेऊन पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला भारताने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. त्या न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने भारताला मोठाच दिलासा मिळाला. त्यामुळे याप्रकरणी भारताने पहिली फेरी जिंकल्याचे आणि पाकिस्तानची नाचक्की झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)