पाकिस्तानचा थयथयाट: म्हणे, सार्क परिषदेच्या आयोजनात भारताकडून खोडा

इस्लामाबाद – सार्क परिषदेच्या फेरआयोजनाच्या प्रक्रियेत भारताकडून खोडा घातला जात असल्याचा थयथयाट पाकिस्तानने केला आहे. संपूर्ण विभागाच्या आर्थिक प्रगतीला आणि विकासाला भारताकडून बाधा पोहचवली जात आहे, अशी आदळआपटही त्या देशाने केली आहे.

याआधीची दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटनेची (सार्क) परिषद 2016 मध्ये पाकिस्तानात होणार होती. मात्र, त्यावर्षी जम्मू-काश्‍मीरच्या उरीमध्ये भारतीय लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने सार्क परिषदेत सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शवली. भारताच्या निर्णयामुळे बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनाही सहभागी होण्यास नकार दर्शवला. त्यामुळे सार्क परिषद रद्द करण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढवली. आता पुन्हा सार्क परिषदेचे आयोजन करण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने हालचाली सुरू केल्या आहेत.

मात्र, सीमेपलिकडील दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा कायम आहे. अशा स्थितीत सार्कसंदर्भात पुढे जाणे अवघड असल्याची रोखठोक आणि तितकीच रास्त भूमिका भारताने घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा फटफजिती होण्याची चिन्हे आहेत. त्यातून पाकिस्तानने सवयीप्रमाणे भारताच्या विरोधात आकांडतांडव सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)