पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग; महिलेचा मृत्यू

जम्मू -पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेवताना आज भारतीय हद्दीत मारा केला. त्यात एक महिला मृत्युमुखी पडली. जम्मू-काश्‍मीरमध्ये पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत ही घटना घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी पूँच क्षेत्रात भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच नागरी भागांना लक्ष्य केले. त्यांनी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. एका गावातील घराजवळ तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यात 40 वर्षीय महिला मरण पावली. याआधी पाकिस्तानी सैनिकांनी पूँच जिल्ह्यात 8 ऑगस्टला केलेल्या माऱ्यात एक भारतीय जवान शहीद झाला होता.

चालू वर्षात पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या आगळिकीचे सत्र वाढले आहे. त्यांनी चालू वर्षात 1 ऑगस्टपर्यंत तब्बल 285 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. मागील वर्षी अशाप्रकारच्या 228 घटना घडल्या होत्या. पाकिस्तानी माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे.

दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्करी जवान जखमी
जम्मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात लष्करी जवान लष्करी जवान सुनील रंधवा जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे समजते. दरम्यान, लष्करी छावणीवरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पलायन केले. त्यांच्या शोधासाठी लष्करी जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)