पाकचा 69 धावांत खुर्दा ; भारताचा 203 धावांनी दणदणीत विजय

ख्राईस्टचर्च – 19 वर्षांखालील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अवघ्या 69 धावांत खुर्दा करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. शुभमन गिलचे नाबाद शतक व ईशान पोरेलच्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने भारताने पाकिस्तानवर तब्बल 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता जेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान, भारताने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 100 धावांनी पराभूत केले असल्याने भारतीय संघाचे मनोबल वाढलेले आहे.

कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने निर्धारीत 50 षटकांत 9 बाद 272 धावा फटकावल्या. शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद 102 धावा आणि कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा यांनी दिलेल्या दमदार सलामी हे भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

-Ads-

पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा यांनी भारताला पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून देत 89 धावांची सलामी दिली. मात्र, दोघांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेणाऱ्या शुभमन गिलने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली.

शुभमन गिलने हार्विक देसाई सोबत तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. हार्विक देसाई 20 धावा करून अर्शद इक्‍बालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्या पाठोपाठ अभिषेक आणि रियान हे झटपट बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला.

शुभमनने एक बाजू लावून धरत अनुकूल रॉय सोबत संघाची धावसंख्या 200 पार नेला. अनुकूल रॉय बाद झाल्यानंतर भारताचा एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. शुभमनने डावातील शेवटच्या चेंडूवर 2 धावा करत शतक पूर्ण केले. गिलने 94 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या. पाकिस्तानकडून मुहम्मद मुसाने 4, तर अर्शद इक्‍बालने 3 विकेट घेतल्या.

273 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची दाणादाण उडाली. ईशान पोरेल यांनी पाकिस्तानच्या सलामीवीरांना झटपट बाद केले. त्यानंतर रौहेल नाझीर आणि साद खान यांनी थोडाफार विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे इतर फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत होते. 50 धावा पूर्ण करण्याआधीच पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. 20 षटकांत पाकिस्तानची 6 बाद 45 धावा अशी बिकट अवस्था होती. अखेर 69 धावांत संपूर्ण संघ गारद झाला. भारताकडून ईशान पोरेलने 17 धावांत चार विकेट घेतल्या. तर शिवा सिंग आणि रियान परागने प्रत्येकी दोन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)