पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

केडगाव- ऐन पावसाळ्यात पाऊस गायब असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने दौंड तालुक्‍यातील शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जून, जुलै आणि ऑगस्ट महिने कोरडे गेले. त्या महिन्यात आलेल्या कालव्याच्या आवर्तनामुळे काहीसा आधार मिळाला होता. तीन महिने कोरडे गेल्याने सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल. या आशेवर शेतकरी होता. परंतु सध्या असणारे वातावरण पाहता नेमका हा महिना पावसाळ्याचा की उन्हाळ्याचा? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावरसुध्दा पावसाने दडी मारली आहे. 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेशाची स्थापना झाली. परंतु गणपती उत्सवात हमखास हजेरी लावणारा वरुणराजा स्थापनेनंतरही रुसलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाच्या चिंता सध्या वाढल्या आहेत. पाऊस झालाच नाही तर, डिसेंबर, जानेवरी महिन्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. शेतकरी वर्गाच्या दृष्टीने समाधानकारक केवळ एकच बाब आहे ती म्हणजे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला. अन्‌ सर्व धरणे भरली आहेत. पाऊस झाला नाहीतर पाटबंधारे खात्याची जबाबदारी जास्त वाढणार आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन ते कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गाला पुरवणे महत्वाचे आहे. 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेशाची स्थापना झाली आता “गणराया, तू तरी पाव’ अशी आर्त हाक सामान्य शेतकरी देताना दिसत असून गणराया पावणार का? असा प्रश्न पडत आहे. दौंड तालुक्‍यात भीमा आणि मुळा-मुठा नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी बांधवांना नदीतील पाण्याचा आधार आहे. कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास या शेतकऱ्यांनाही उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होऊ शकते. परंतु तालुक्‍याच्या दक्षिण पट्ट्यात असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती धोक्‍यात येऊन त्यांचे आर्थिक गणित बिघडन्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पावसाची नितांत आवश्‍यकता असून शेतकरी त्याच्या येण्याची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)